बोर बफर झोन एकसंघ नियंत्रणाचा प्रस्ताव रखडला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:34 AM2021-01-08T05:34:13+5:302021-01-08T05:34:20+5:30
देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प
- महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प’ अशी ओळख असलेल्या बोर प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाईड कंट्रोल) प्रस्ताव काही वर्षांपासून धूळ खात पडला आहे. या प्रकल्पाचा बफर झोन २०१५ मध्ये जाहीर करण्यात आला असून त्याचे एकसंघ नियंत्रण हे वन्यजीवांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे.
सेलू तालुक्यातील या प्रकल्पात सहा प्राैढ वाघ, दहा-बारा बिबटे, ३५ अस्वली, २६ हून जास्त रानकुत्री, हजारोंच्या संख्येने सांबर, चितळ, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. हा प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरत आहे. प्रकल्पाचा कोअर झोन १३,८०० हेक्टर तर बफर झोन ६७,८१४ हेक्टर आहे पण बफर झोनची जबाबदारी सध्या प्रादेशिक वनविभागाकडे आहे. आपत्कालीन परिस्थितीत ठोस निर्णय घेताना अधिकाऱ्यांची अनेकदा तारांबळ उडते. त्यामुळे बफर झोनचे एकसंघ नियंत्रण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
हा फायदा होणार
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास या परिसराचे नियंत्रण हे वन्यजीव विभागाकडे येऊन मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार आहेत.
प्रस्तावाचा प्रवास
उपवनसंरक्षक, वर्धा यांनी ८ मे २०२० रोजी एकसंघ नियंत्रणाचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांना पाठविला. या कार्यालयाने तो कार्यवाही करून २१ मे २०२० रोजी अप्पर प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) यांना पाठविला. या कार्यालयाने हा प्रस्ताव शासनाला सादर केला.