आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीत भरभराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 04:21 PM2020-10-15T16:21:34+5:302020-10-15T16:23:12+5:30
Wardha News सहा महिन्यांच्या आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीमध्ये ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांची भरभराट झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजना राबवित असताना नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचाही दंडुका उगारला. परिणामी, सहा महिन्यांच्या आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीमध्ये ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांची भरभराट झाली आहे.
कोरोनाचा शिरकाव होताच जिल्हा प्रशासनाने आठही तालुक्यांमध्ये संचारबंदी लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर १८८ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे तसेच सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बाहेर जिल्ह्यातून प्रवास करणे आदींबाबत कारवाई करण्यात आली. २३ मार्च २०२० पासून २२ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत महसूल, ग्रामविकास, पोलीस व नगर पालिका प्रशासनच्या माध्यमातून सहावेळा मोहीम राबवून ११ हजार ५१५ व्यक्ती, आस्थापनांवर कारवाई करीत ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांचा दंड वसूल केला. या कालावधीमध्ये विनाकरण घराबाहेर फिरणाऱ्यांचे तसेच विनापरवानगी जिल्ह्यात दाखल झालेल्यांची तब्बल ९४० वाहने जप्त करण्यात आली.