धरणांची सुरक्षा वाऱ्यावर...

By admin | Published: July 11, 2017 12:55 AM2017-07-11T00:55:28+5:302017-07-11T00:55:28+5:30

महाकाळी येथील धरणात गत आठवड्यात चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. असाच प्रकार रविवारी नागपूर येथे घडला.

Protecting the dams in the wind ... | धरणांची सुरक्षा वाऱ्यावर...

धरणांची सुरक्षा वाऱ्यावर...

Next

जिल्हाधिकाऱ्याच्या सूचनेला बगल : कोणीही या, जलतरणाचा आनंद घ्या, अशीच स्थिती
अभिनय खोपडे, विजय माहुरे, अरविंद काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाकाळी येथील धरणात गत आठवड्यात चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. असाच प्रकार रविवारी नागपूर येथे घडला. यात दहा जणांचा बळी गेला. याच पार्श्वभूमिवर ‘लोकमत’ने सोमवारी काही मोठ्या धरणाच्या सुरक्षेबाबत स्टींग आॅपरेशन केले असता यात कोणत्याही धरणावर सुरक्षा नसल्याचे समोर आले आहे. सुरक्षेच्या नावावर केवळ ‘येथे पोहण्यास सक्त मनाई आहे’ असे फलक असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात एकूण १४ जलाशये
वर्धा जिल्ह्यात एकूण १४ जलाशयांची नोंद आहे. यात बोर, महाकाळी, पोथरा यासह काही मध्यम व लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा आढाचा घेतला असता येथे कोणीही या आणी मस्त जलक्रीडा करा, असा प्रकार येथे सुरू असल्याचे दिसून आले आहे.
जलाशयांची पातळी वाढल्यास सुरक्षेचा धोका
येत्या दिवसात पाऊस आल्यावर या जलाशयात पाण्याची पातळी वाढणार आहे. यामुळे ते आणखीच धोक्याचे होणार आहेत. यामुळे या जलाशयाजवळ सुरक्षा रक्षकांची नेमणूक होणे गरजेचे झाले आहे. या संदर्भात जलाशय असलेल्या भागातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत; मात्र त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
पातळी कमी असल्याने गाळात फसण्याची शक्यता
सध्या जिल्ह्यातील जलाशयात असलेली पातळी कमी आहे. यामुळे पाण्यात उतरलेला व्यक्ती गाळात फसण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे धरणात पोहण्याकरिता गेलेल्यांना वरून उडी मारताना अटकाव करण्याची गरज आहे. यामुळे या दिवसात येथे सुरक्षा रक्षकांची नितांत आवश्यकता असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पाटबंधारे विभाकडून दुर्लक्ष
महाकाळी येथील घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत धरणांवर सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात चर्चा झाली. एचढेच नाही या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या; परंतु त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही.

बोर व धाम जलशयात पोहणाऱ्यांची संख्या वाढली
सेलू तालुक्याच्या बोर धरणात आणि आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम धरणात सध्या पोहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्ह्यात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात असला तरी या धरणाच्या भींतीच्या खाली उतरून पोहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. शेकडोच्या संख्येने नागरिक धरणातील साठवलेल्या पाणीसाठ्याजवळ पोहचत असल्याचे दिसून आले. अनेक जण येथे पोहत असताना मोबाईलच्या सहाय्याने चित्रीकरण व सेल्फीही घेतात. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. धरणाच्या भिंतीजवळ पोहणाऱ्यांनी कपडे वाळण्यासाठी ठेवले असल्याचे दिसून आले. धरण परिसरात पाटबंधारे विभागामार्फत कोणताही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिक धरणाच्या पाण्यात सहजपणे प्रवेश करून पोहण्याचे काम करीत आहे. या नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो ही बाब माहीत असूनही याकडे त्यांचे दुर्लक्षच आहे. धरणाच्या मुख्य भिंतीवर पाटबंधारे विभागाने जलशयात पोहू नये, असा फलक लावला असला तरी त्याकडे नागरिकांचे व पर्यटकांचे दुर्लक्ष आहे. जलाशयात पोहण्यास सक्त मनाई असा फलक येथे उभा आहे. मात्र संपूर्ण धरण परिसराची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शिवाय धाम प्रकल्पातून धरणाच्या भिंतीकडे जात असलेला रस्ता बंद करण्याची गरज आहे. याच मार्गावर अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.

चौकीदार चौकीतून बेपत्ता
येथील बोर धरणांवर चौकीदार नियुक्त करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र हा चौकीदार कुठे होता, त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

महाकाळी येथील घटना घडल्यानंतरच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पाची व्यवस्था बघणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावण्यिात आले होते. त्यांना या घटना टाळण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच धरणांवर सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. याकडे विभाग प्रमुखांचे दुर्लक्ष झाले असल्यास त्यांना पुन्हा तशा सूचना देण्यात येतील.
- मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी

महाकाळी धरण परिसरात दामिनी पथक दिवसातून दोन वेळा गस्त घालते. तर खरांगणा पोलिसांकडूनही रोजच या भागात पेट्रोलींग करण्यात येत आहे. यात काही आक्षेपार्र्ह प्रकार दिसल्यास त्यांना फटकारण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे असे असले तरी या भागात पाटबंधारे विभागाकडून सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
- विजय चौधरी, ठाणेदार, पोलीस ठाणे, खरांगणा (मोरांगणा)

Web Title: Protecting the dams in the wind ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.