वर्ध्यात ढोल वाजवून कामगार विरोधी धोरणांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:24 PM2018-02-16T16:24:16+5:302018-02-16T16:25:20+5:30
एस.टी. कर्मचारी यांचा कामगार करार तात्काळ करण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्र वारी सेवाग्राम भागातील रापमच्या विभागीय कार्यालयासमोर रापमच्या कर्मचाऱ्यांनी ‘ढोल बजाओ शासन जगाओ’ आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एस.टी. कर्मचारी यांचा कामगार करार तात्काळ करण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्र वारी सेवाग्राम भागातील रापमच्या विभागीय कार्यालयासमोर रापमच्या कर्मचाऱ्यांनी ‘ढोल बजाओ शासन जगाओ’ आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांकडून विभाग नियंत्रक राजेश अडोकार यांना सादर करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी ढोल वाजवून आपला निषेध नोंदवला.
या आंदोलनादरम्यान एस.टी. कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन कर्मचारी यांचा प्रलंबित कामगार वेतन करार त्वरीत करण्यात यावा, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, राज्य परिवहन कर्मचाचाऱ्यांना राज्य शासनाचा दर्जा देण्यात यावा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील खोटे आरोपपत्र रद्द करावे, ग्रामीण जनतेला योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, शासनाने महामंडळात सुधारणा करण्याच्या दृष्टीने बजेटची तरतूद करून राज्य परिवहन महामंडळात सुधारणा करावी आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. आंदोलनात धर्मपाल ताकसांडे, रवींद्र मांडवे, एम.एस.ओरके, राजू पाटील, रमेश कांबळे, श्रीकांत ढेपे, नंदकुमार कांबळे, विजय खोब्रागडे, पृथ्वीराज वाघमारे, अनिल थुल, पंकज नगरकर, शेख रज्जाक आदी सहभागी झाले होते.