बौद्ध बांधवांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:47 AM2018-06-20T00:47:55+5:302018-06-20T00:47:55+5:30
वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या शिरपूर या गावात बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ला करण्यात आला. यात घरात शिरून वृद्ध महिला, मुलींना मारहाण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या शिरपूर या गावात बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ला करण्यात आला. यात घरात शिरून वृद्ध महिला, मुलींना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विकृत मानसिकतेच्या आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी समता सैनिक दलाने केले. याबाबत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिरपूर गावात १७ मे रोजी बौद्ध समाजातील महिला ग्रा.पं. समोरील विहिरीवर पाणी भरायला गेली असता लोकांनी मनाई केली. विहिरीत शेण, माती, नालीतील घाण टाकून पाणी दूषित केले. याबाबत अनसिंग पोलीस ठाण्यात ठाणेदारांनी तक्रार न घेता प्रकरण गावात मिटविण्याचा प्रयत्न केला; पण तोडगा निघाला नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेतली नाही. सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांनी विहीर मोकळी केली. गावात दवंडीही दिली. बौद्ध महिलांनी विहिरीवर पाणी भरले असता सायंकाळी जातिवाद्यांनी बौद्ध वस्तीवर हल्ला केला. ही घटना लांच्छणास्पद असून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी समता सैनिक दलाने केली. निवेदन देताना अभय कुंभारे, प्रदीप भगत, भीमराव लोहकरे, यशवंत कांबळे, विलास मून, गौतम टेंभरे, दूर्योधन कांबळे, नितीन कांबळे, प्रदीप भगत आदी उपस्थित होते.