मोर्चा काढून नोंदविला ‘त्या’ घटनेचा निषेध
By admin | Published: March 9, 2017 01:00 AM2017-03-09T01:00:53+5:302017-03-09T01:00:53+5:30
जिल्हा माजी सैनिक एकता मंचच्यावतीने शहरातील शिवाजी चौक भागातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आमदार प्रशांत परिचारक
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा माजी सैनिक एकता मंचचे आंदोलन
वर्धा : जिल्हा माजी सैनिक एकता मंचच्यावतीने शहरातील शिवाजी चौक भागातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
निवेदनातून, पंढरपूर येथील आमदार परिचारक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकींदरम्यान सैनिकांची खिल्ली उडविणारे विधाने केली. ती अतिशय संतापजनक आहे. सदर प्रकार देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा अपमान करणारी आहेत. आमदार परिचारक यांना तातडीने पदमुक्त करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी निवेदनातून केली. या मोर्चात भारतीय माजी सैनिक संघटनेचे श्याम परसोडकर, राजेंद्र मेघे, विवेक ठाकरे, राजाभाऊ वानखेडे, संभाजी ब्रिगेट, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी, माजी सैनिक सहभागी होते.(शहर प्रतिनिधी)
अ.भा. जनवादी महिला संघटनेने नोंदविला निषेध
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभा घंगारे यांच्या नेतृत्त्वात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आमदार प्रशांत परिचारक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आल्या आहेत. निवेदन देताना दुर्गा लाकडे, प्रतीक्षा हाडके यांच्यासह अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.