रास्तारोकोतून हाथरसच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:01+5:30
रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेला प्रकार निंदनिय असून पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना वाटेत अडविण्यात आले. या दोन्ही घटनांचा निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने रविवारी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.
आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तर काही वेळानंतर आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात सचिन वैद्य, विजय सोनटक्के, अंगद गिरिधर, अक्षय राठोड, विशाल बोके, रज्जाक अली, सुबोध गोंडसे, सुरज मुंदरे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.
तासभरानंतर सुरळीत झाली वाहतूक
आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन टायर जाळल्याने नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून जळत्या टायर विझवून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तासानंतर सुरळीत केली.
केंद्राच्या कृषी विधेयकास दर्शविला विरोध
राष्ट्रीय महामार्गावरील टि-पॉर्इंटवर रस्तारोको आंदोलन करणाºया आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी विषयक विधेयकाचाही विरोध केला. शिवाय हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याने ते तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी रेटली.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून ६८ प्रमाणे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय काही वेळानंतर त्यांनी सुटका करण्यात आली आहे.
- रवी राठोड, ठाणेदार, पोलीस स्टेशन तळेगाव (श्या.पंत.).
हाथरस येथे घडलेला प्रकार, तेथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेत्यांना वाटेत अडविण्यात आले तसेच केंद्र सरकारचे कृषी विधेयक या प्रमुख मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. केंद्र व उत्तरप्रदेशातील योगी सरकार दडपशाहीचा अवलंब करीत असून त्याचा निषेध आम्ही केला.
- सचिन वैद्य, जिल्हा समन्वयक, युवा काँग्रेस.