प्रत्येक महा ई- सेवा केंद्रावर आधार कार्ड केंद्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:16 AM2018-01-01T00:16:22+5:302018-01-01T00:16:33+5:30

प्रत्येक बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करण्याचा नियम शासनाने केला आहे; पण वृद्ध नागरिकांकडे पूर्ण जन्म तारखेचे आधार कार्ड वा जन्म दाखला नाही. परिणामी, त्यांचे पॅन कार्डही तयार होत नाही. मग, बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक कसे करणार, हा प्रश्नच आहे.

 Provide Aadhar Card Center at each Maha E-Seva Kendra | प्रत्येक महा ई- सेवा केंद्रावर आधार कार्ड केंद्र द्या

प्रत्येक महा ई- सेवा केंद्रावर आधार कार्ड केंद्र द्या

Next
ठळक मुद्दे नागरिकांची मागणी : वेळेची होईल बचत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येक बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करण्याचा नियम शासनाने केला आहे; पण वृद्ध नागरिकांकडे पूर्ण जन्म तारखेचे आधार कार्ड वा जन्म दाखला नाही. परिणामी, त्यांचे पॅन कार्डही तयार होत नाही. मग, बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक कसे करणार, हा प्रश्नच आहे. यासाठी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर आधार कार्ड केंद्र द्यावे, अशी मागणी भारतीय नागरिक अधिकार सामाजिक न्याय परिषदेने केली आहे.
आधार कार्डमधील जन्म तारीख, नाव, पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जी कागदपत्रे दिली जातात, त्यांच्याच आधारावर कार्डमध्ये दुरूस्ती करून देण्याचा शासकीय नियम केंद्र शासनाने करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबत भारतीय नागरिक अधिकार सामाजिक न्याय परिषदेचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते शोऐब अहेमद कन्नौजी, बेग दिलदार उर्फ समीर, सैय्यद रशीद अली, कय्युम मजीद खान, शेख मोहम्मद शफी, नौशाद अब्बास शहा, जयवंत हराळे, भूषण भिसे, प्रणय नरांजे, गणेश जाधव, वच्छला कांबळे, वैशाली हराळे, नारायण भीसे, ईश्वर कोकाटे, वृशाली कोकाटे, प्रथमेश अंबुलकर, सुरेश नेहारे, उषा नेहारे, तनुश्री नेहारे, प्रथमेश नेहारे, शमशाद बेगम, सायरा बी शेख, नेहा नेहारे, हर्षल नेहारे, यश नेहारे, समीर नेहारे, सेवक लांजेवार, कविता लांजेवार, समीर लांजेवार, विहान जाधव, शुत्रिका जाधव, पूर्वी बाभुळकर, अनुज घुंगरे, श्रेया हराळे, आकृती हराळे, सोनम घुंगरे, दर्शना हराळे, बबन घुंगरे, योगिता घुंगरे, ज्योती हराळे, रूपाली हराळे, तेजराव मांजरे आदींनी निवेदन दिले आहे.
आधार कार्ड, बँक खाते, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक आदी लिंक करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रारंभीच्या आधार कार्डमध्ये संपूर्ण जन्म तारखेची नोंद नाही. इंग्रजीत स्पेलिंग दुरुस्ती वा मराठीमध्ये त्रूटीयुक्त नावे असल्याने स्वत:च्या नावाची दुरूस्ती करण्यासाठी स्वत:चे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज भासत आहे. वर्धा शहरात अनेक महाआॅनलाईन सेवा केंद्र आहेत; पण या केंद्रांमध्ये मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड, बँक खाते व इतर शासकीय योजनेत आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा नाही. परिणामी, नागरिकांना अन्यत्र भटकंती करावी लागते. बहुतांश शाळांतील विद्यार्थ्यांचे नवीन आधार कार्ड अद्याप तयार करण्यात आलेले नाही. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आहे; पण त्यांच्या आधार कार्डमध्ये इंग्रजीतील नावात स्पेलींग मिस्टेक तथा मराठी नावात काना, मात्रा, उकार, विलांटी आदींच्या त्रूट्या आहेत. अनेकांच्या कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद असण्याऐवजी केवळ जन्माचे वर्ष लिहिलेले आहे. या त्रूट्यांमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. या चुका दुरूस्त करण्याकरिता आधार केंद्रामध्ये तसेच पॅन कार्ड सेवाकेंद्रात जन्म तारखेच्या व नावाच्या संदर्भात ओरिजनल लिव्हींग सर्टीफिकेट मान्य केले जात नाही. यामुळे त्यांच्या आधार कार्डातील त्रूटी दुरुस्त होत नाही. विशेषत: विवाहित महिलांचे नाव आधार वा पॅन कार्डवर दुरुस्त करताना रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट वा गॅजेट सर्टिफिकेट मान्य केले जाते. गॅजेट करण्याकरिता एक ते दीड हजार रुपये खर्च येतो. आधारमध्ये नाव दुरुस्त करीत असताना गॅजेट पेपर नसल्यास नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्र बनवून आणावे, असे आधार केंद्राचे संचालक अर्जदाराला सांगतात. नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्र बनविण्यासाठीही एक ते दोन हजार रुपये खर्च करावा लागतो. सोबत मानसिक त्रास होत असून हा दूर करणे गरजेचे आहे.
जन्माचे दाखले नसल्याने वृद्धांची होते गोची
अनेक नागरिकांच्या आधार कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद नाही. परिणामी, त्यांना पॅन कार्ड तयार करून मिळत नाही. नवीन पॅन कार्ड तयार करायचे असल्यास यासाठी लागणारे दस्तावेज, जन्म तारखेचा दाखला वा आधार कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद असणे गरजेचे आहे. असे असले तरी वृद्ध नागरिकांकडे जन्म दाखला नसल्याने तथा आधार कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद नसल्याने पॅन कार्ड तयार करणारी एजन्सी पॅन कार्ड तयार करून देत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्म तारखेची नोंद असल्याने ते ग्राह्य धरणे गरजेचे आहे; पण लिव्हींग सर्टिफिकेटला पॅन कार्ड एजन्सी मान्य करीत नाही. यामुळे नागरिकांना पॅन कार्डपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, पॅन कार्ड तयार करताना नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व आॅनलाईन होत असल्याने हा मानसिक, आर्थिक त्रास दूर करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

Web Title:  Provide Aadhar Card Center at each Maha E-Seva Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.