वर्धा शहर स्वच्छतेसाठी २५ टक्के निधीची तरतूद
By admin | Published: March 1, 2017 12:50 AM2017-03-01T00:50:54+5:302017-03-01T00:50:54+5:30
येथील नगर परिषदेची विशेष अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात मंगळवारी पार पडली.
नव्या चमूचा पहिला अर्थसंकल्प : पालिकेचे ७८.४४ कोटींचे नियोजन
वर्धा : येथील नगर परिषदेची विशेष अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात मंगळवारी पार पडली. यात ७८ कोटी ४४ लाख ६९ हजार ३०७ रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात २५ टक्के रक्कम स्वच्छता अभियानाकरिता राखीव असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षाअखेर सर्व उत्पन्न व खर्च वजा जाता ३९ लाख ३४ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे.
पालिकेत सत्तांतरण झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असल्याने याकडे वर्धेकरांचे विशेष लक्ष लागले होते. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सादर केला. यावेळी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सर्वच विषय समित्यांचे सभापती तथा सर्वच सदस्यांची उपस्थिती होती. या संकल्पाला सभागृहात उपस्थित सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.
सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात भारत स्वच्छता व अभियानाकरिता एकूण बजेटच्या २५ टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. यात एकूण महसूली उत्पन्न ४२ कोटी ९२ लाख २० हजार रुपये दर्शविण्यात आले आहे. तर भांडवली उत्पन्न २० कोटी ३० लाख ७० हजार रुपये दर्शविले आहे. या दोन्ही प्रस्तावित उत्पन्नातून यंदाचा खर्च करण्यात येणार आहे. यात महसुली खर्च ३८ कोटी १९ लाख ८५ हजार तर भांडवली खर्च २९ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दर्शविण्यात आला आहे. या खर्चानंतर ३९ लाख ३४ हजार ३०७ रुपये शिल्लक राहणार असल्याचे अर्थसंकल्प दर्शवित आहे.
पालिकेच्या सर्वप्रकारच्या अस्थापना खर्चावर २३ कोटी ४७ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च आहे. कार्यालयीन खर्चावर १ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र कचरा पसरला आहे. या घनकचरा व्यवस्थापनाकरिता ५ कोटी, नाला सफाई २५ लाख, कचरा उचलने ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पाणी पुरवठ्याकरिता ५० लाख, पाईपलाईन देखभाल दुरूस्तीकरिता ३० लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. दिवाबत्तीकरिता २५ लाख तर पथदिव्यांच्या देयकापोटी १ कोटी रुपये प्रस्तावित आहे. प्राथमिक शाळा दुरूस्तीकरिता एकूण अर्थसंकल्पातील १ टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. शिक्षण विभागाकरिता ७० लक्ष रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे.(प्रतिनिधी)