पीएससी अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:37 PM2019-01-18T23:37:14+5:302019-01-18T23:38:07+5:30
सेवाग्राम रेल्वेस्थानकाची मध्य रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीच्या अध्यक्षांसह इतर अधिकारी आणि सदस्यांनी शुक्रवारी, १८ जानेवारी रोजी दुपारी पाहणी केली. दरम्यान, स्थानकावरील अस्वच्छता व इतर कारणांवरून रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम रेल्वेस्थानकाची मध्य रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीच्या अध्यक्षांसह इतर अधिकारी आणि सदस्यांनी शुक्रवारी, १८ जानेवारी रोजी दुपारी पाहणी केली. दरम्यान, स्थानकावरील अस्वच्छता व इतर कारणांवरून रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी दोन जणांना एकूण १५ हजारांचा दंड ठोठावण्याचे त्यांनी निर्देश दिले.
मध्य रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रत्न यांच्यासह १६ अधिकारी सदस्यांच्या चमूने सेवाग्राम येथील रेल्वेस्थानकाला भेट दिली. यावेळी रेल्वेस्थानकावरील फलाटावर तसेच अन्य ठिकाणी कमालीची अस्वच्छता आणि देखभालीचा अभाव आढळून आल्याने संबंधितांची कानउघाडणी केली. पाऊस तास दिलेल्या भेटीत त्यांनी अधिकाºयांचा क्लास घेतला. देशभरात स्वच्छतेचा उत्सव साजरा केला जात असताना स्थानकावर इतकी अस्वच्छता का, असा सवाल त्यांनी करीत अधिकारी आणि कंत्राटदारांना फटकारले. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी जय नागवाणी, हरिओम भानोट, सुरेंंद्र भगत, लाल मणिपाल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. के. मिश्रा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय डॅनियल यांच्यासह १६ जण उपस्थित होते.
स्थानकावर दाखल होताच रमेशचंद्र रत्न यांनी प्रथम उच्च श्रेणी प्रतीक्षालय, जॉन्सन लिफ्टची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहताना अनेक ठिकाणी गळती लागल्याचे दिसून आल्याने संबंधितांवर प्रश्नांचा भडिमार केला. परंतु, त्यांच्याकडे काही उत्तरच नसल्याने त्रेधातिरपीट पाहायला मिळाली. नळांची तातडीने दुरुस्ती करण्यासह फलाटावरील उखडलेल्या टाइल बदलविण्याचेही त्यांनी फर्मान सोडले.
तिकीटघरावरील गांधीचे जीवनदर्शन घडविणारी चलचित्रफीत पाहून मात्र त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या दोन दिवसांत अन्य स्थानकांना आकस्मिक भेटी देण्याचेही त्यांनी सांगितले. पाहणीदरम्यान सेवाग्राम स्थानकाचे खंड वाणिज्य निरीक्षक अभय पुनवटकर, स्थानक व्यवस्थापक पी. तरुणगोपाल मुजूमदार, प्रवीण कवाडे, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कर्मचारी, सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खाद्यपदार्थ स्टॉलधारकाला ठोठावला दंड
मध्य रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रत्न यांनी स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेत्या स्टॉलधारकाची कसून चौकशी केली. खाद्यपदार्थांच्या डब्यांवरील एक्स्पायरी डेटमध्ये गैरप्रकार तसेच हिशेबात अनियमितता आढळून आल्याने संचालकाला चांगलेच खडे बोल सुनावले. याचवेळी एक बिस्किटचे पॅकेट खरेदी करून बिलाची मागणी केली. अनेक बाबीत अनियमितता आढळून आल्याने इंटारसी येथीलकंत्राटदार गोयल अॅण्ड गोयल कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिले. यावेळी स्टॉलधारकाला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
‘स्वच्छ भारत’चे स्टीकर कुठंय?
स्थानकावरील शौचालयात रमेशचंद्र रत्न यांनी स्वत: जात तेथे येत असलेल्या दुर्गंधीविषयी नापसंती व्यक्त केली. यावेळी ‘आपको बदबू आ रही है क्या?‘ अशीही अनेकांंना विचारणा केली. शौचालयाची नियमित स्वच्छता केली जात नाही, देशभरात स्वच्छता अभियान साजरे होत असताना स्वच्छ भारतचा संदेश देणारे स्टीकर का लावण्यात आले नाही, अशी विचारणा कंत्राटदार उपस्थित नसल्याने निरीक्षकाकडे केली. यावेळी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश देत स्टीकर लावण्याचेही सांगितले.
अधिकारी तब्बल पाच तास पोहोचले उशिरा
स्थानकाची पाहणी करण्याकरिता समिती सकाळी १० वाजता येत असल्याबाबत निरोप आला. त्यामुळे स्थानकावरील अधिकारी, कर्मचारी सकाळीच स्वच्छता व इतर कामाला लागले. मात्र, अध्यक्षांसह समितीच्या गाड्यांचा ताफा तब्बल पाच तासांनी म्हणजे ३.१५ वाजता स्थानकावर दाखल झाली. यात स्थानिक रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांची चांगलीच ताटकळ पाहायला मिळाली. सफाई कामगारांनाही तीनवेळा स्थानक परिसराची स्वच्छता करावी लागल्याने तेही त्रागा व्यक्त करताना दिसले.
आपको कुछ तकलीफ है क्या....?
पाहणीदरम्यान प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रत्न यांच्यासह समितीतील अधिकाºयांना अनेक प्रवासी फलाटावर खालीच बसून आढळले. या प्रवाशांशी त्यांनी संवाद साधत ‘स्टेशनपर आपको कुछ तकलीफ है क्या, बताओ असे म्हटले. याचवेळी संबंधितांना चारही फलाटांवर २० दिवसांच्या आत प्रत्येकी चार-चार सिमेंटचे बाक बसविण्याबाबत आदेश दिले.
रेल्वे हा देशाच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे स्वच्छता व इतर बाबी रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रस्थानी असून प्राधान्य दिले जात आहे. यामुळेच सर्वच रेल्वेस्थानकांची पाहणी केली जात आहे. काही स्थानकांना आकस्मिक भेटी दिल्या जाणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आमचे कर्तव्य आहे.
रमेशचंद्र रत्न, अध्यक्ष प्रवासी सेवा समिती, मध्य रेल्वे