व्हीआयपी सेवेकरिता ‘तो’ पीएसआय अमरावतीत
By admin | Published: July 16, 2015 12:05 AM2015-07-16T00:05:24+5:302015-07-16T00:05:24+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार शक्य असताना केवळ पोलिसांच्या सहकार्याने व्हीआयपी सेवेकरिता विनयभंग प्रकरणातील सेलू ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी या आरोपीला...
विनयभंग प्रकरणातील आरोपी : जिल्हा सामान्य रुग्णालयातही उपचार शक्य
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार शक्य असताना केवळ पोलिसांच्या सहकार्याने व्हीआयपी सेवेकरिता विनयभंग प्रकरणातील सेलू ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी या आरोपीला अमरावती येथे पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. याकरिता त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका विभाग प्रमुखाचेही सहकार्य मिळाल्याचे बोलले जात आहे.
सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आदिवासी युवतीचा विनयभंग करून फरार असलेल्या या उपनिरीक्षकाला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस आल्याचे पाहुन येथूनही पसार होण्याच्या तयारीत त्याने उंचारून उडी घेतल्याने तो जखमी झाला. जखमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याने येथील उपचारावर अविश्वास दाखवित अमरावती येथे उपचार करण्याची मागणी केली.
वैद्यकीय सुत्रानुसार, त्याच्यावर वर्धेत उपचार शक्य होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला आणले असता त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरिता बंदूकधारी पोलीस तैनात होते. यावरून त्याच्यावर असलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात येते. असे असताना त्याने अमरावती येथे उपचार देण्याची मागणी केली. त्याची ही मागणी तात्काळ मान्य करण्यात आली. यामुळे पोलिसांकडूनच त्याला व्हीआयपी सेवा पुरविण्यात येत असल्याचा आरोप होते आहे. त्याच्यावर उपचारानंतर अटकेची कारवाई करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याची माहिती आहे. त्याला अशाच अवस्थेत न्यायालयात हजर केल्यास कारवाई करणे कठीण जाणार असल्याचे पोलिसांकडून बोलले जात आहे. सदर उपनिरीक्षकाच्या अटकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
चौधरीविरूद्ध पत्नीची कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार
आदिवासी युवतीचा विनयभंग करणारा सेलू ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक राजू चौधरी विरूद्ध त्याच्या पहिल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केल्याची माहिती आहे. ही तक्रार तिने सन २००९ मध्ये गोंदिया पोलिसात दिली होती. या तक्रारीची चौकशी सुरू असताना राजू चौधरी वर्धेत पदोन्नतीवर आल्याची माहिती मिळताच त्याच्या पत्नीने वर्धा गाठत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी तिला ठाण्यात पाठविले. येथेही प्रकरणाची नोंद करण्यात आली. यावरून तिला महिला तक्रार निवारण कक्षात समज देण्याकरिता बोलविण्यात आल्याची माहिती आहे. याच तक्रारीत झालेल्या चौकशीची माहिती विचारण्याकरिता तिने माहितीच्या अधिकाराचा वापर केल्याची माहिती आहे. मात्र या अर्जावर स्वाक्षरी केली नसल्याने तो परत करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
चौधरीकडून बोरधरण परिसरात एक नाही तर अनेक प्रकार घडल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मात्र यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या तिसऱ्या आरोपीला अटक करण्याबाबत पोलीस प्रशासन उदासिन असल्याचा आरोप होत आहे.