१४४ प्रकरणांचा लोकअदालतीत निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:41 PM2018-09-11T23:41:43+5:302018-09-11T23:42:26+5:30
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७१ प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करण्यात आला. २ कोटींवर अधिक रकमेची वसूली या न्यायालयाच्या निवाड्यातून करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७१ प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करण्यात आला. २ कोटींवर अधिक रकमेची वसूली या न्यायालयाच्या निवाड्यातून करण्यात आली. जिल्ह्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबीत प्रकरणांपैकी ७१ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. सदर प्रकरणांमध्ये २ कोटी ४३ लाख ६१ हजार ८४३ रूपये मुल्य होते. तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ७३ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. वाद दाखलपूर्व प्रकरणामधील निकाली काढलेल्या तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य ६ लाख ३० हजार ३३२ इतके होते. न्यायालयीन प्रलंबीत प्रकरण व वाद दाखलपूर्व प्रकरणे मिळवून १४४ प्रकरणे निकाली काढण्यात आले. याचे तडजोड मुल्य २ कोटी ४९ लाख ९२ हजार २१५ रूपये इतके आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीचा मुख्य उद्देश म्हणजे न्यायालयात प्रलंबीत प्रकरणाचा आणि वाद दाखलपूर्व प्रकरणाचा जास्तीत जास्त निपटारा करणे होय. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकाराचा वेळ व पैसा याची बचत होवून पक्षांना मानसिक समाधान मिळते. तसेच आपसी समझोत्यामुळे तडा गेलेल्या व दुरावा निर्माण झालेल्या संबंधाना जोडण्याचा प्रयत्न केला जातो, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधीकरणच्या जिल्हाध्यक्ष एम.जे. थोटे यांनी केले. वर्धा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सर्व जिल्हा न्यायाधीश, सर्व दिवाणी न्यायाधीश, जिल्हा शासकीय अभियोक्ता व अभियोक्ता संघाचे अध्यक्ष तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नि.उ. परमा उपस्थित होते.