पोलीस तपासाविरोधात जनता येणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:57 PM2017-12-19T23:57:51+5:302017-12-20T00:00:47+5:30
येथील समीर मेटांगळे हत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या तपासावर सर्वसामान्यांकडून संशय व्यक्त होत आहे. या हत्या प्रकरणात धनदांडग्यांकरिता कायदा बदलत असंल्याचा आरोप होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील समीर मेटांगळे हत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या तपासावर सर्वसामान्यांकडून संशय व्यक्त होत आहे. या हत्या प्रकरणात धनदांडग्यांकरिता कायदा बदलत असंल्याचा आरोप होत आहे. याच आरोपामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपास पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) दिलीप सावंत यांच्याकडे वळता केला आहे. यामुळे आता या तपासात काय निघते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. पोलिसांचा तपास योग्य दिशेने व्हावा याकरिता बुधवारी वर्धेतील युवकांकडून प्रोटेस्ट मार्च काढण्यात येत आहे.
तत्पूर्वी आरोपीने हत्या करून पळ काढण्याकरिता वापरलेली दुचाकी आणि चाकू रामगनर पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र ही दुचाकी कोणची याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीचे बयाण नोंदविण्याची कारवाई लवकरच होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या हत्या प्रकरणातील आरोपी विभव गुप्ता व त्याला सहकार्य करणारे दोन्ही संशयीताविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, ही मुख्य मागणी यावेळी करण्यात येणार आहे. उद्या बुधवारी सकाळी १०.३० वाजता स्थानिक शिवाजी चौक येथून प्रोटेस्ट मार्चला प्रारंभ होणार आहे. हा मार्च शिवाजी चौक, बढे चौक, इतवारा चौक मार्गक्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचणार आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे.
या मार्चला प्रहार अपंग क्रांती संघटना, युवा परिवर्तन की आवाज आदींनी समर्थन दिले असून यात शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मृतक समीरची आई श्यामली संजय मेटांगळे, भाऊ चेतन मेटांगळे आदींनी केले आहे.
अखेर पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाले
या हत्या प्रकरणाच्य आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाले नव्हते. तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता होताच त्यांना तीन साक्षीदार मिळाले आहे. त्यांची साक्ष अद्याप नोंदविण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी नव्या अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणातील आरोपींचे बयाण नोंदविले आहे. रात्री उशिरा पोलिसांकडून मृतकाच्या मित्राचे बयाण घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांना एक, दोन नव्हे तीन साक्षीदार मिळाले असल्याने यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई होणारच, असे पोलीस बोलत आहेत.
प्रहार व शिवसेनेचे एसपींना साकडे
या हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे प्रकरणाचा तपास कुठलाही भेदभाव न करता नि:ष्पक्ष करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी प्रहार अपंग क्रांती संघटना व शिवसेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना सादर करण्यात आले.
नव्या तपास अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
समीर मेटांगळे हत्या प्रकरणाची सूत्रे स्वीकारताच पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) दिलीप सावंत यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेलाच करावयाचा असल्याने पोलीस निरीक्षक पोटे यांनी प्रकरणाच्या कागदपत्राचा अभ्यास केला असल्याचे सांगितले. शिवाय या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
कायदा म्हणतो
एखाद्याला गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन देणे, शिवाय आरोपीला मदत होईल अशा पद्धतीने त्याच्यासोबत जात घटना घडल्यावर त्याला सोबत घेऊन घटनास्थळावरून पसार होणाऱ्यांवर भादंविच्या कलम ३४ व १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करता येत असल्याचे कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. परंतु, अद्यापही या कलमांकडे पोलिसांचे लक्ष गेले नाही हेच नवल.