‘संस्कार पर्व’तून पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:52 PM2017-09-06T23:52:39+5:302017-09-06T23:52:50+5:30
मानवी जीवनाचा सर्वांगिण विकास त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. या शिक्षणात मूल्य शिक्षणाचे संस्कार रूजविण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मानवी जीवनाचा सर्वांगिण विकास त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. या शिक्षणात मूल्य शिक्षणाचे संस्कार रूजविण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय, गांधी विचार परिषद व जि.प. शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून सार्थक जीवनासाठी ‘संस्कार पर्व’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौजन्यशीलतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रूजविण्याचा प्रयत्न होत आहे. एकप्रकारे या पुस्तकाच्या माध्यमातून बालकांच्या मनावर पंतप्रधानाची छबी उमटविण्याचा प्रयत्न प्रशासनाने जाणीवपूर्वक केला आहे.
वर्धा जिल्हा परिषद व इतर प्रशासकीय यंत्रणांच्या पुढाकारातून सार्थक जीवनासाठी संस्कार पर्व हे रंगीत स्वरूपाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात अर्थ नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, डीआयईसीपीडीच्या प्राचार्य रेखा महाजन, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता किरण पांडे तसेच गांधी विचार परिषदेचे अध्यक्ष भरत महोदय आदींचे संदेश आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संवेदनशिलता, वक्तशिरपणा, निटनेटकेपणा, स्त्री-पुरूष समानता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टीकोण, सर्वधर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आदी मूल्यांची ओळख करून देण्यात आली आहे. यात विविध प्रकारचे छायाचित्र संबंधित मूल्यांच्या आधारावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
निटनेटकेपणा विद्यार्थ्यांना समजावून देताना जि.प. प्राथमिक शाळा, हावरे ले-आऊट सेवाग्राम येथील छायाचित्र वापरण्यात आले आहे. याशिवाय श्रमप्रतिष्ठेची माहिती देताना याच शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो देण्यात आला आहे; पण सौजन्यशीलता हे मूल्य समजावून सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोजाणीवपूर्वक या पुस्तकात घेण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. इतर सर्व मूल्य समजावून देताना कुठेही थोरपुरूषांचे फोटो वापरण्यात आले नाही. वक्तशिरपणा समजावून सांगताना रेल्वेमागे धावणारा इसम हा फोटो वापरण्यात आला आहे; पण पंतप्रधानांची माहिती जाणिवपूर्वक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांची छबी या पुस्तकात देण्यात आली आहे. एकूणच हा सारा प्रकार प्रशासनाने पंतप्रधानासाठीच केला असावा, अशा प्रतिक्रिया आता शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडूनही उमटत आहेत.