पावसामुळे पुलगावचा गांधी चौक चिखलमय

By admin | Published: June 18, 2017 12:37 AM2017-06-18T00:37:16+5:302017-06-18T00:37:16+5:30

पुलगाव शहरातील अनेक रस्त्यांची, नाल्यांची कामे करण्यात आली. सुशोभिकरणासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात

Pulganga's Gandhi Chowk is muddy due to the rain | पावसामुळे पुलगावचा गांधी चौक चिखलमय

पावसामुळे पुलगावचा गांधी चौक चिखलमय

Next

नगर पालिकेचे दुर्लक्ष : संपूर्ण चौकच खड्ड्यात गेल्याचा भास, उपाययोजनांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/पुलगाव : पुलगाव शहरातील अनेक रस्त्यांची, नाल्यांची कामे करण्यात आली. सुशोभिकरणासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात ‘चेकर्स’ लावण्यात आलेत; पण शहरातील मुख्य चौक असलेल्या गांधी चौकाचा उद्धार करण्यात आला नाही. सर्व रस्ते उंच आणि गांधी चौक खड्ड्यात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, चौकात पाऊस येताच चिखलाचे साम्राज्य असते. शुक्रवारी आलेल्या पावसामुळे गांधी चौकात चिखल, डबक्यांचे साम्राज्य पाहावयास मिळाले.
आठ रस्ते मिळणारा शहरातील एकमेव चौक म्हणूण गांधी चौकाची ओळख आहे. पूर्वी या चौकात मघ्यभागी महात्मा गांधींचा पुतळा आणि आठही रस्त्यांवर दुकाने होती. कालांतराने पालिका प्रशासनाने या मुख्य चौकात उद्यान निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यानाची निर्मिती करण्यात आली; पण यात कुठेही नियोजन दिसून आले नाही. मध्यभागी उद्यानाची निर्मिती करून सभोवताल गाळे काढता आले असते; पण तसे झाले नाही. परिणामी, उद्यानाच्या सभोवताल अतिक्रमण वाढले आहे. शहरातील मुख्य चौक असल्याने कापडाच्या दुकानांसह भाजीपाला व अन्य वस्तूंची दुकानेही येथे आहेत. पालिकेने या जागेचे योग्य नियोजन करून उद्यान, दुकान गाळे काढून रस्ते, नाल्यांची निर्मिती केली असती तर शहराचे सौंदर्य खुलले असते; पण सध्या गांधी चौक खड्ड्यांत असल्याचा भास होतो. गांधी चौकाला मिळणारे तीन रस्ते सोडले तर उर्वरित रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. यामुळे पाच रस्ते उंच झाले असून त्या रस्त्याचे पाणी गांधी चौकात येते. शिवाय गांधी चौकातील एकाही रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले नाही. शिवाय सिमेंट चबुतराही बांधण्यात आला नाही. परिणामी, गांधी चौकाला पाऊस येताच डबक्याचे स्वरूप प्राप्त होते.
शुक्रवारी दुपारी व सायंकाळी आलेल्या पावसामुळे गांधी चौकात सर्वत्र डबके साचले आहेत. चिखलामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. गांधी चौकातील प्रत्येक दुकानासमोर डबके व चिखल साचल्याने व्यवस्थित उभेही राहता येत नाही. शिवाय भाजीविके्रते तसेच अन्य व्यावसायिकांना आपली दुकाने लावतानाही त्रास सहन करावा लागत आहे. डबके, चिखलाचे साम्राज्य आणि गुरांचा संचार यामुळे हा चौक शहराचेच विद्रुपिकरण करीत असल्याचा भास होतो. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत गांधी चौकाचे योग्य नियोजन करून सुशोभिकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रकाश व्यवस्थाही तोकडीच
शहराचा मुख्य चौक असलेल्या गांधी चौकात उद्यानामध्ये हायमास्ट लाईट लावणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. शहरात अनेक ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले; पण गांधी चौकातील प्रकाश व्यवस्थेकडे कुणीही लक्ष दिल्याचे दिसत नाही. परिणामी, उद्यान व परिसरात अंधुक प्रकाश असतो. पथदिव्यांचीही व्यवस्था तोकडीच असल्याने नागरिक, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नव्याने सत्तेत आलेली भाजपा शहरातील गांधी चौकाच्या विकासासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गांधी चौकातील बालोद्यान हटवून दुकान गाळे होणार, अशी चर्चा होती; पण अद्याप हालचाली नाहीत. किंबहुना, उद्यान हटविण्यासही विरोध असल्याचे बोलले जाते. यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेला उद्यानामध्ये सुधारणा करून सभोवताल दुकान गाळे काढता येऊ शकतात.
तत्पूर्वी संपूर्ण परिसरात सिमेंटचा उंच चबुतरा निर्माण करणे व त्यानंतर विकास कामे करणे गरजेचे आहे. या दृष्टीने पालिका प्रशासन पावले उचलणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pulganga's Gandhi Chowk is muddy due to the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.