खुनाच्या सत्राने पुलगाव हादरले
By Admin | Published: March 28, 2017 12:58 AM2017-03-28T00:58:48+5:302017-03-28T00:58:48+5:30
शहरात हत्यांचे सत्रच सुरू झाल्याचे जाणवत आहे. गत नऊ दिवसात येथे तीन हत्या झाल्या आहेत. सततच्या हत्यांमुळे पुलगाव चांगलेच हादरले आहे.
आठवडी बाजारात युवकाची हत्या : नऊ दिवसातील तिसरी घटना
पुलगाव : शहरात हत्यांचे सत्रच सुरू झाल्याचे जाणवत आहे. गत नऊ दिवसात येथे तीन हत्या झाल्या आहेत. सततच्या हत्यांमुळे पुलगाव चांगलेच हादरले आहे. यातच सोमवारी भर दुपारी आठवडी बाजाराच्या दिवशी भर दुपारी एका युवकाची भोसकून हत्या झाल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. शशांक प्रशांत करवाडे (२२) रा. अशोक नगर असे मृतकाचे नाव असून मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
शहरात घडलेल्या तीन हत्यांपैकी एका प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दोन घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. आज झालेल्या हत्येतील आरोपी पोलिसांच्या हाती आन्ल्याचे समजते. मात्र त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस सांगत आहे.
पोलीस सुत्रानुसार, शहरातील अशोक नगर भागातील शशांक हा २२ वर्षीय युवक घरासमोर बसला होता. दरम्यान त्याच भागील कल्पेश टेंभुर्णे नामक युवकाने येथे येत त्याच्यावर गुप्तीने सपासप वार केले. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शशांकचा जागीच मृत्यू झाला झाला. हल्ला करून कल्पेश टेंभूर्णे याने घटनास्थळाहून पळ काढला. मृतदेहाची पोलिसांनी पाहणी केली असता छातीवर, पोटावर व हातावर गुप्तीचे पाच घाव असल्याचे दिसून आले.
मृतक युवक हा पॉलिटेक्नीकचा विद्यार्थी असून त्याचा खून जुन्या वादातून झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी झालेल्या दोन पैकी एका खूनाच्या आरोपीचा अद्यापही शोध लागला नाही. यामुळे येथील पोलीस यंत्रणेच्या कार्य प्रणालीवर नागरिकांत कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे पुढील तपास करीत आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अटकेची कारवाई करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
जुन्या वैमनस्यातून घडले आजचे हत्याकांड; पोलिसांची माहिती
आज झालेल्या हत्येच्या कारणाचा उलगडा करण्यात पुलगाव पोलिसांना यश आले आहे. मृतक शशांक करवाडे व आरोपी कल्पेश टेंभूर्णे यांच्यात कौटुंबिक वाद होता. या वादातून दीड वर्षापूर्वी दोन परिवारात कडाक्याचे भांडण झाले होते. यात आरोपीच्या बहिणीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुलगाव पोलिसात शशांक करवाडे, त्याचे वडील व आईच्या विरोधात हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण तपासाअंती न्यायप्रविष्ट करण्यात आले. यात करवाडे कुटुंबातील सदस्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याच काळापासून कल्पेश टेंभूर्णे याने करवाडे कुटुंबातील सदस्यांना संपविण्याची योजना आखली होती. या संदर्भात कल्पेश काहींशी बोललाही होता. यातच आज त्याने शशांकला संपविल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
चार घटनांत पाच जणांचा मृत्यू
पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या महिन्याभऱ्यात चार हत्या झाल्या. या चार हत्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या हत्यात एक इंझाळा येथे बापलेकांची हत्या झाली. तर पुलगाव शहरात पालिका शाळेच्या चपराशाची, नंतर एका चालकाची तर आता एका युवकाची हत्या झाली. यामुळे शहरात चांगलीच दहशत माजली आहे.
चपराशाच्या हत्येचा सुगावा नाही
पुलगाव येथील नगर परिषदेच्या शाळेत कार्यरत चपराशाची हत्या करण्यात आली. या हत्येला आठ दिवसांचा कालावधी होत असतानाही पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्वी झालेल्या आपसी वादातून शहरात हत्या होत आहेत. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. काही हत्या प्रकरणातील आरोपींला अटक करण्यात यश आले आहे तर काही हत्यांचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच आठवड्यात तीन हत्या झाल्याने यावर कसा आळा बसवावा, यावर वरिष्ठांशी चर्चा करू.
-मुरलीधर बुराडे, ठाणेदार, पुलगाव