पुलफैलात ‘वॉश आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:06 AM2019-03-16T00:06:54+5:302019-03-16T00:08:08+5:30
शहर पोलिसांनी स्थानिक पुलफैल परिसरात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूगाळण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात गावठी मोह दारू असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर पोलिसांनी स्थानिक पुलफैल परिसरात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूगाळण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात गावठी मोह दारू असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
प्राप्त माहितीनुसार, पुलफैल येथील शुभम सदानंन काळे रा.पुलफैल हा गावठी दारूची निर्मिती करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. पोलिसांनीया कारवाईत २० प्लास्टीक कॅन मधील सुमारे २ हजार लिटर कच्चा मोह रसायन सडवा, दोन लोखंडी ड्रम मधील २०० लिटर उकळता मोह रसायन सडवा, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे दोन लोखंडी ड्रम, दोन घमिले, गावठी दारू व इतर साहित्य असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात नितनवरे, बाबाराव बोरकुटे, दिनेश तुमाने, अमरदीप पाटील, गितेश देवघरे, धर्मराज पटले, प्रेमदेव सराटे यांनी केली.
शिवनी पारधी बेड्यावरील दारू विके्रत्यांवर कारवाई
समुद्रपूर : शिवनी पारधी बेड्यावर मोठ्या गावठी दारू निर्मिती करून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समुद्रपूर पोलिसांनी आज केलेल्या वॉश आऊट मोहिमेदरम्यान उजेडात आला आहे. पोलिसांनी या भागात वॉश आऊट मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कच्चा मोह रसायन सडवा आणि गावठी मोह दारू ताब्यात घेवून ती नष्ट केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई समुद्रपूरचे ठाणेदार यांच्या प्रत्यक्ष हजेरीत अरविंद येनूरकर, राजेंद्र ठाकरे, नारायण काळे, धनंजय पांडे, रुपचंद भगत, रवी पुरोहित, चेतन पिसे, अजय वानखेडे, वैभव जगणे, वीरेंद्र कांबळे आदींनी केली.
अट्टल दारूविक्रेत्याला ठोकल्या बेड्या
आकोली : सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल दारूविक्रेता अशी ओळख असलेल्या विशाल रंगारी याला दारूविक्री करीत असताना सेलू पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी दारूसाठा जप्त केला आहे. यापूर्वी जमादार अर्जुन दिक्षित तसेच शिपाई मनिष कांबळे यांनी आरोपी विशाल रंगारी याच्या मालकीची सुरगाव शिवारातील दारूभट्टी उद्ध्वस्त केली होती. विशाल रंगारी याच्याविरुद्ध दारूविक्री, निर्मिती तसेच दारूतस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून त्याचा शोध अनेक दिवसांपासून पोलीस घेत होते.अखेर त्याला बेड्या ठोकण्यात सेलू पोलिसांना यश आले आहे.