वर्धा जिल्ह्यातील भोजाजी महाराज मंदिरात पुरणपोळी स्वयंपाकाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 02:57 PM2020-12-01T14:57:35+5:302020-12-01T14:59:56+5:30
१ डिसेंबरपासून शासकीय नियमांचे पालन करीत दिवसाला केवळ ५० पुरणपोळी स्वयंपाक सुरु करण्याचा निर्णय आजनसरा येथे भोजाजी महाराजांचे मंदिर संस्थानने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांपासून आजनसरा येथे भोजाजी महाराजांचे मंदिर दर्शनासाठी आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी बंद करण्यात आले होते. मागील आठवड्यापासून महाराजांचे समाधी दर्शन सुरु करण्यात आले आहे. मात्र, भाविकांची पुरणपोळीची ओढ आणि आतुरता बघता १ डिसेंबरपासून शासकीय नियमांचे पालन करीत दिवसाला केवळ ५० पुरणपोळी स्वयंपाक सुरु करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.
आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र हे येथील पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. रविवारी आणि बुधवारी संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक भक्त आजनसरा येथे पुरणपोळीचा स्वयंपाक घेवून येतात. मात्र, कोविडचा कहर बघता मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, मागील आठवड्यात समाधी दर्शन सुरु केले आहे. मात्र, भाविकांची स्वयंपाकाची ओढ बघता दिवसाला केवळ ५० स्वयंपाकालाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच एका स्वयंपाकावर फक्त ५० लोकांनाच प्रवेश असणार आहे.
१५ दिवसांपूर्वी करावी लागणार नोंदणी
पुरणपोळीचा स्वयंपाक ठेवण्यासाठी १५ दिवसांपूर्वी देवस्थानच्या कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करता येणाऱ्या स्वयंपाकांना मंदिरपरिसरात प्रवेश दिला जाणार नाही. संस्थांनकडून निर्गमित झालेल्या नियमांचे पालन करुन भोजाजी महाराज संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी केले आहे.
ज्येष्ठांना प्रवेशबंद
स्वयंपकास्थळी प्रसाद घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य राहणार आहे. दहा वर्षांआतील मुले, ज्येष्ठनागरिक तसेच गर्भवती महिलांना स्वयंपाकस्थळी प्रवेशबंदी राहणार आहे. भाविकांनी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.