जिल्ह्यात १६.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:47 PM2018-01-24T23:47:47+5:302018-01-24T23:48:49+5:30
खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १६.७२ लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्याच घशात गेला असून सीसीआयला केवळ १२०० क्विंटल कापूस खरेदी करता आला आहे.
पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा सोयाबीनवर विपरित परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर भर दिला. जिल्ह्यात कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आली. पेरा वाढल्याने तथा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यंदा कपाशीचे पीक भरघोस येईल, अशी अपेक्षा होती; पण बीटी बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केला. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचा कापूस एक-दोन वेच्यातच संपला. काही शेतकऱ्यांना शेतात नांगर चालवावा लागला. अनेक भागांतील शेती आजही पांढरी दिसून येते; पण अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे कापूस चिकट आला आहे. तो वेचण्यास जड असल्याने मजूरही मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. आता तर मजुरांची मजुरी वाढल्याने कापूस वेचावा की नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल असून शेती मात्र पांढरी झाल्याचे दिसून येत आहे.
या स्थितीतही बाजारपेठेत कापसाची आवक मात्र बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यात आजपर्यंत १६ लाख ७३ हजार ४७५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यातील केवळ ११९७ क्विंटल कापूस सीसीआयद्वारे खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित १६ लाख ७२ हजार २७६ क्विंटल कापूस बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. यंदा शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; पण अद्यापही भाववाढ न झाल्याने तथा आर्थिक हतबलता लक्षात घेत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असल्याची स्थिती आहे.
सीसीआयच्या चार केंद्रांवर खरेदी शून्य
वर्धा जिल्ह्यात सीसीआयकडून सेलू, सिंदी (रेल्वे), हिंगणघाट, देवळी, कांढळी आणि वायगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; पण यातील केवळ दोनच केंद्रांवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणला. उर्वरित चार केंद्रांमध्ये खरेदीचा मुहूर्तही साधता आलेला नाही. सेलू केंद्रावर १ हजार ६७ क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे केवळ १३५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयकडून ठरलेला ५०५० एवढाच भाव मिळत असल्याने आणि व्यापारी रोखीने चुकारे तथा अधिक भाव देत असल्याने शेतकऱ्यांचा कलही व्यापाºयांना कापूस विकण्याकडेच असल्याचे दिसून येते.
५३ व्यापाऱ्यांनी खरेदी केला कापूस
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ५३ खरेदीदार संस्था, व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आहे. यात आर्वी, आष्टी, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर बाजार समिती अंतर्गत येणाºया व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.