गौराईच्या आगमनावर पितळीची खरेदी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2016 01:01 AM2016-09-07T01:01:15+5:302016-09-07T01:01:15+5:30
गौराई आवाहन आता एक दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे खरेदीकरिता महिलांची लगबग पाहायला मिळते.
पितळी मुखवट्यांना मागणी : स्थानिक बाजारपेठेत मुरादाबादच्या पितळी वस्तू
श्रेया केने वर्धा
गौराई आवाहन आता एक दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे खरेदीकरिता महिलांची लगबग पाहायला मिळते. गौरीचा थाटमाट मोठा असल्याने त्यांच्या स्वागतात कोणतीच उणीव राहू नये म्हणून काळजी घेतली जाते. पुजेकरिता, श्रृंगाराकरिता लागणाऱ्या सर्व वस्तूंची जोमाने खरेदी सुरू असून स्थानिक बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. गौराईच्या आगमनावर पितळी वस्तूंच्या खरेदीत यंदा वाढ झाल्याचे बाजारात दिसून येते. स्थानिक बाजारपेठत खास मुरादाबाद येथील बनावटीच्या वस्तू दाखल झाल्या आहेत.
यामध्ये महालक्ष्मीचे मुखवटे विशेष आकर्षक ठरत आहे. यासह पुजेकरिता लागणाऱ्या समई, नंदादीप, तबक, नैवेद्याचे ताट अशा वस्तू पितळी धातूच्या बनावटीत विविध आकरात व स्वरूपात विक्रीकरिता उपलब्ध आहेत. भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरी आवाहन होते. घरोघरी गौरीची स्थापना करून पूजन केले जाते. यातही महालक्ष्मीच्या नैवेद्याचा थाट मोठा असतो. या नैवेद्याकरिता पितळीचे ताट तयार केले आहे. ताटावर कलाकुसर करण्यात आली आहे. याशिवाय उदबत्तीचे घर, धुपआरती, कापूरपाळी, दिवा अशा पितळीपासून तयार केलेल्या वस्तू बाजारात आहेत. त्यामुळे मातीच्या बनावटीतील वस्तू मागे पडल्या आहे.
महालक्ष्मी मुखवटे पितळी बनावटीचे खरेदी होत आहे, अशी माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. यात होणारी उलाढाल लक्षावधींची आहे. यासर्व पितळी वस्तू सणांकरिता खास मुरादाबाद आणि अलिगढ येथून आणल्या आहेत. तिथे पितळी वस्तू बनावटीची मोठा बाजारपेठ आणि कलाकार आहेत. स्थानिक पातळीवर पितळी मूर्ती बनविणारे कलाकार नसल्याने या सर्व वस्तू बाहेरून आणाव्या लागत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.