पावसाळ्यापूर्वी चणा खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:51 PM2018-05-26T23:51:51+5:302018-05-26T23:51:51+5:30
रबी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चण्याची लागवड केली. काही भागात कालव्याचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना घेता आले. त्यामुळे त्यांना चण्याचे पीक घेणे सोईचे झाले. चण्याच्या मळणीनंतर अनेक शेतकरी सध्या बाजार पेठेत चणा विक्रीकरिता नेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : रबी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चण्याची लागवड केली. काही भागात कालव्याचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना घेता आले. त्यामुळे त्यांना चण्याचे पीक घेणे सोईचे झाले. चण्याच्या मळणीनंतर अनेक शेतकरी सध्या बाजार पेठेत चणा विक्रीकरिता नेत आहेत. त्यांना योग्य भाव मिळावा या हेतूने देवळी तालुक्यातील नाफेडची चण्याची खरेदी सुरू करण्यात यावी, अशा सूचना आ. रणजीत कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिल्यात.
बाजारभाव व नाफेडच्या दरात फार तफावत आहे. नाफेडकडून चण्याला दिला जाणारा भाव शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात समाधानकारक आहे. देवळी तालुक्यात पुलगाव व देवळी येथे नाफेडची खरेदी केंद्र असल्याने तेथे चण्याची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी, असेही यावेळी आ. कांबळे म्हणाले.
नाफेडला चण्याची विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोदणी बंधनकारक आहे. देवळी तालुक्यात सुमारे १ हजार २०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, पावसाळा तोंडावर असून अद्यापही खरेदी सुरू झालेली नाही. शेतीच्या कामाची लगबग सुरू झाल्यावर पेरणीच्या कामाला शेतकरी प्रथम प्राधान्य देतात. अशावेळी चण्याच्या विक्रीसाठी न्यायचा की शेतीची कामे हा संभ्रम निर्माण होईल. तरी शेतकरी वर्गाची अडचण लक्षात घेता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाफेडने चण्याची खरेदी करावी व तशा सूचना आपण त्यांना द्याव्या, असे यावेळी आ. कांबळे यांनी स्पष्ट केले.