आर्वी बाजारात सर्वाधिक तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:39 PM2018-05-17T21:39:58+5:302018-05-17T21:39:58+5:30
सध्या राज्यातील शासकीय तूर खरेदी बंद झाली आहे. ती सुरू होण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. याच काळात आर्वी बाजार समितीत आतापर्यंत १८ हजार ७६४ क्विंटल तूर खरेदी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सध्या राज्यातील शासकीय तूर खरेदी बंद झाली आहे. ती सुरू होण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. याच काळात आर्वी बाजार समितीत आतापर्यंत १८ हजार ७६४ क्विंटल तूर खरेदी केली. येथे आॅनलाईन नोंद झालेल्यापैकी १,७४५ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी झाली आहे. यात अजून २,५११ शेतकरी तूर घेवून रांगेत आहेत. यामुळे अनेकांच्या नजरा मुदतवाढीच्या पत्राकडे लागल्या आहेत.
यावर्षी आर्वी बाजारात शासकीय खरेदी केंद्रावर तालुका खरेदी विक्री संघाकडे ४,२५६ शेतकºयांनी तूर खरेदीची आॅनलाईन नोंदणी केली. यात आर्वी बाजार समितीने वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ७६४ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. यात १,७४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात अजून २,५११ शेतकऱ्यांना २५ हजार क्विंटल तूर येण्याची अपेक्षा आहे. आर्वी बाजार समितीत चणा खरेदीसाठी ६५९ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. यात ११८ शेतकऱ्यांचा १९५६ क्विंटल चणा खरेदी करण्यात आला आहे. यात चणा खरेदीसाठी अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
आर्वी बाजार समितीत गत दोन दिवसात चण्याची विक्रमी आवक झाल्याने सध्या बाजार समितीची चणा खरेदी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. यात बाजार समित्यांचे गोदाम फुल झाल्याने नवीन माल ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने तातडीने माल खरेदीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
नवा खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना अजूनही तूर खरेदीची अपेक्षा आहे. यात शासनाने मुदतवाढ दिल्याने उर्वरित शेतकऱ्यांची तूर शासनाने तातडीने खरेदी करावी, जेणेकरुन तुरीच्या हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडेल.
राज्यात दोन लाख शेतकऱ्यांची नोंदणी
गोदामाचे कारण काढून शासनाच्या पणन महामंडळाच्यावतीने तूर खरेदी बंद करण्यात आली. यामुळे आॅनलाईन नोंदी करून असलेल्या शेतकऱ्यांना ही मुदत वाढण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात आजच्या घडीला सुमारे दोन लाख शेतकरी नोंदणी करून आहेत. त्यांच्याकडून मुदतवाढीची मागणी आहे.
आर्वी बाजार समितीने यावर्षी शेतकऱ्याची विक्रमी तूर खरेदी केली आहे. अजूनही बरेच शेतकऱ्याची तूर खरेदी व्हायची आहे. उर्वरीत तूर शासनाने तातडीने खरेदीकरुन हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. तूर खरेदीबाबत मुदत वाढीचे पत्र अद्याप बाजार समितीला प्राप्त झाले नाही.
- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती,आर्वी.