वाहत्या पाण्याला अडवून जिरविणे हाच उद्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:20 AM2018-06-06T00:20:31+5:302018-06-06T00:20:31+5:30
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे,
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे, थांबलेल्या पाण्याला अडविणे व अडविलेल्या पाण्याला जमिनीत जिरविणे हा उद्देश केंद्रस्थानी ठेवल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कामकरिता राज्यातील ७५ तालुक्यात दिलेल्या जेसीबी व पोकलॅन्डमुळे मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्यामुळे सुमारे ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याची माहितीही जैन यांनी यावेळी दिली. जैन पुढे म्हणाले, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनात गत दोन वर्षांपासून आम्ही वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांना पाणीदार करण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्ड पुरवित आहोत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात जेसीबी व पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये ४० मशीनी १४ हजार ३२८ तास चालवून ९४ कोटी ८६ लाख ६६ हजार लिटर पाणी साठविता येईल इतके काम करण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने गत २५ वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये पुढाकार घेत कार्य केले जात आहे. आता दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गांधी, विदर्भ अध्यक्ष अनिल फरसोले, राज्य सदस्य प्रदीप जैन, योगेंद्र फत्तेपुरीया, अभिषेक बेद, आगरकर हजर होते.
बुलढाणा जिल्हा होतोय सुजलाम-सुफलाम
संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न मोठे आहे. त्या दिशेने सध्या वाटचालही सुरू आहे. बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा मानस उराशी बाळगत सध्या युद्धपातळीवर कामही सुरू आहे. या जिल्ह्यात १३४ पोकलॅन्ड व जेसीबीच्या सहाय्याने जलसंवर्धनाची विविध कामे केली जात आहे. तेथे केवळ तीन महिन्यात ४५ लाख क्युबिक मिटर गाळ विविध नद्या व नाल्या तसेच जलाशयांमधून काढण्यात आला आहे. हा गाळ जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सध्या झालेल्या कामामुळे ४५० कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे.
स्पर्धेनंतर मशीन जलयुक्त शिवारसाठी
४५ दिवसांची वॉटर कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय जैन संघटनेच्यावतीने दुष्काळमुक्त महाराष्ट्र या हेतूने सदर जेसीबी व पोकलॅन्ड मशीन काही जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबाबतची विनंती काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांनी आमच्या संघटनेकडे केली होती असे यावेळी सांगण्यात आले.