पवनारच्या ‘धाम’ बंधाऱ्यात उंच कारंजी बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:12+5:30
राष्ट्रपित्याच्या स्मारकाच्या कामात दिरंगाई व दर्जाहीनता खपवून घेतली जाणार नाही असे सांगत पालकमंत्री केदार पुढे म्हणाले, सेवाग्राम येथे आश्रमासमोर बांधण्यात आलेल्या डॉरमेंट्रीच्या मागे चांगल्या दर्जाचे फेंसिंग आणि जुने पंप हाऊस पाडून नवीन पंप हाऊसचा प्रस्ताव तातडीने तयार करून मंजूर करून घेण्यात यावा. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पवनार येथील धाम नदी काठावर लावलेले पेविंग ब्लॉक असमतोल आहे. ते कंत्राटदाराकडून तातडीने काढून घेत पुन्हा बसविण्यात यावे. नदीवर असलेल्या बंधाºयाच्या पाणी साठ्यात उंच कारंजी बसविण्यात यावे. त्यामुळे धामच्या सौंदर्यात भर पडले. शिवाय प्रवेशद्वार आकर्षक करून धाम नदीच्या दुसऱ्या काठावरील काम सोमवारी सुरू करावे. पवनार आणि सेवाग्राम येथे लावण्यात येणारी रोपटे वनविभाग आणि सामाजिक वनीकरणच्या सल्ल्याने लावण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक शनिवारी पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी आ. रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, मुख्य सा.बा.चे कार्यकारी अभियंता गजानन टाके, अभियंता संजय मंत्री, मीरा अडाळकर, जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्चे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मेंढे व बोरकर आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रपित्याच्या स्मारकाच्या कामात दिरंगाई व दर्जाहीनता खपवून घेतली जाणार नाही असे सांगत पालकमंत्री केदार पुढे म्हणाले, सेवाग्राम येथे आश्रमासमोर बांधण्यात आलेल्या डॉरमेंट्रीच्या मागे चांगल्या दर्जाचे फेंसिंग आणि जुने पंप हाऊस पाडून नवीन पंप हाऊसचा प्रस्ताव तातडीने तयार करून मंजूर करून घेण्यात यावा. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आहे. येथे देशविदेशातून अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे उभारण्यात आलेल्या सर्व वास्तू स्वच्छ आणि नीटनेटक्या राहाव्यात म्हणून देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कायमस्वरूपी निधी देण्याची तरतूद करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. सेवाग्राम चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले आहे. तेथील विकास कामे तात्काळ सुरू करण्यात यावे. जे. जे. स्कूल आॅफ आर्टस्च्यावतीने एम. आय. डी. सी मध्ये स्क्रॅप पासून तयार करण्यात येत असलेले महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे स्क्लपचर आणि केलेली इतर कामे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
बिल्डकॉनच्या खोदकामाविषयी अधिकाऱ्यांना चौकशीची तंबी
दिलीप बिल्डकॉन या कंस्ट्रक्शन कंपनीने सहा मीटरपेक्षा जास्त खोदकाम करून मुरूम काढला आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी यासाठी संबंधित कंपनीवर पेनॉल्टी का लावली नाही, असा प्रश्न उपस्थित करून याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल अशी तंबीच यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली.