प्रचाराचे बॅनर लावले; पण घरमालकाची परवानगी घेतली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 06:39 PM2024-11-09T18:39:32+5:302024-11-09T18:40:31+5:30
Vardha : दर्शनी भागावर फलक लावण्यासाठी चढाओढ
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामनी) : जसजशी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतशा गावखेड्यात प्रचार यंत्रणा जोर धरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक कोणतीही असो, उमेदवारांचे बॅनर हा मुख्य घटक मानला जातो. विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत असलेल्या उमेदवारांचे बॅनर मुख्य चौकातील घरांच्या दर्शनी भागात लावण्यासाठी गावातील कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू आहे.
उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी घरमालकाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. परंतु, काही कार्यकर्त्यांना याची माहितीसुद्धा नसते. विनापरवानगीच ते बॅनर लावून मोकळे होतात. आजघडीला गावातील धनाढ्य शेतकरी शहरांच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तरीही त्यांच्या घराला उमेदवारांचे बॅनर लागलेले दिसून येतात. यामुळे ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते. बॅनर लावताना कुणाची परवानगी घेतली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणूक विभागाने ग्रामीण भागात फेरफटका मारला तर असे अनेक ठिकाणी विनापरवानगी कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे बॅनर व फलक लावल्याचे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. विनापरवानगी बॅनर लावणे हे सुद्धा आचारसंहितेच्या उल्लंघनात येत असून तो उमेदवार कारवाईस पात्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काहींनी ठेवले घरावर तुळशीपत्र
काहींनी घरावर तुळशीपत्र ठेवून विधानसभा निवडणूक डोक्यावर घेतलेली दिसत आहे. ते आधी गाव पारावर जाऊन आपल्या नेतेगिरीचा तोरा मिरवतात. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील सार्वजनिक ठिकाणी, पानटपरी, गावठाण असो अथवा गावपाराच्या ठिकाणी निवडूक विषयावर चर्चा रंगलेल्या दिसून येत आहेत. यात अनेकांचा सहभाग असून, वेळ घालवत बराच विचार- विमर्श करत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. काही गावनेत्यांना तर झोपेचेही भान राहिलेले नाही.
नैसर्गिक थंडीवर राजकीय तापमान भारी
नोव्हेंबर महिना म्हटला की थंडीचा जोर वाढतो. मात्र, यंदा थंडीचा जोर ओसरला असून, निवडणुकीचा जोर ग्रामीण भागात जोमात बघायला मिळत आहे. या निवड- णुकीत काँग्रेस, भाजप, बसपा, वंचित सोबतच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून, कोण बाजी मारणार? यावर ग्रामीण भागातील चौकाचौकांत चर्चा रंगत आहे. यामुळे नैसर्गिक थंडीवर राजकीय तापमान भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.
पांढऱ्या पोशाखाची मागणी वाढली
नुकतीच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असल्याने गावागावात राजकीय चर्चेचा विषय गाव पारावर रंगलेला दिसून येतो. एवढेच नाही तर गावागावातील तथाकथित राजकीय गावनेता हा शुभ्र पांढऱ्या रंगाचे कपडे घालून मिरवताना दिसत आहे. यामुळे पांढऱ्या पोशाखाची मागणी वाढली आहेत.