१२ वर्षांपासून प्रलंबित जमिनीचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:32 PM2018-03-19T22:32:46+5:302018-03-19T22:32:46+5:30
नेरीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जिद्द, चिकाटी व प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे आणि शासनावर ठेवलेला विश्वास तसेच इच्छाशक्तीमुळे आज १२ वर्षापासून प्रलंबित असलेला जमिनीच प्रश्न मार्गी लागला आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : नेरीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जिद्द, चिकाटी व प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे आणि शासनावर ठेवलेला विश्वास तसेच इच्छाशक्तीमुळे आज १२ वर्षापासून प्रलंबित असलेला जमिनीच प्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय त्यांना हक्काची जमीन मिळाली आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी नेरी येथील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप कार्यक्रमात केले.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शाह, पं. स. सदस्य सविता मुते, सरपंच धनराज टुले यांची उपस्थिती होती. आ. भोयर पुढे म्हणाले, आर्वी तालुक्यातील मौजा नेरी, अंतरडोह, वाढोणा (ठा.) येथील प्रकल्पग्रस्तांची जमीन १२ वर्षांपूर्वी निम्न वर्धा प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रासाठी संपादीत करण्यात आली होती. जमिनी व घरे बुडीतक्षेत्रात गेल्यामुळे त्यांचे शासनाच्यावतीने नेरी (पुनर्वसन) सालोड येथे भूखंड देऊन पूनर्वसन करण्यात आले;पण त्यांची जमीन बुडित क्षेत्रात गेल्यामुळे पर्यायी जमीन मिळण्यासाठी शासनाकडे नेरीचे सरपंच यांनी पाठपुरावा केला. तसेच आमदार म्हणून आपण स्वत: महसूलमंत्र्यांकडे सदर प्रश्न लावून धरला. त्याला शासनाने मंजुरी देवून ११ शेतकºयांना पर्यायी जमिनी उपलब्ध करून दिल्या आहे. यासाठी पुनर्वसन विभाग व नेरी येथील प्रकल्पग्रस्तांनी मोठी कामगीरी केली आहे. उर्वरित शेतकºयांना लवकरच जमिनीचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी आ. भोयर यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शाह यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात रामभाऊ जाधव, भीमराव काळबांडे, विनोद टोकशे, मारोती झलके, प्रवीण टोकश, बाबाराव टोकशे, प्रभाकर निस्ताने, गंगाधर सेलोकार, रंगाराव सेलोकार, विठ्ठल डेहणकर यांना पर्यायी जमिनीचे आदेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राखी जयस्वाल यांनी केले.