झोपडपट्टीवासीयांच्या समस्या त्वरित सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:18 PM2018-06-04T23:18:37+5:302018-06-04T23:18:47+5:30
जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर झोपडपट्टी धारक गत अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत. ज्या जागेवर ते राहत आहेत. त्या जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे त्यांना देण्यात आले नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून त्यांना तात्काळ जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अतुल दिवे, विशाल रामटेके, पंकज लभाने, सुरज बडगे, स्वप्नील गोटे, कुणाल सहारे, आशीष जामुळकर, नितीन कुंभारे, प्रदीप कांबळे, सुरज मुन, मंगेश मेश्राम, प्रज्वल डंभारे, प्रकाश कोरडे यांच्यासह भीम टायगर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरपीआयच्या नेतृत्त्वात जिल्हाकचेरीवर धडक
जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांच्या समस्या निकाली काढा यासह शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नेतृत्त्वात सोमवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येताच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्त्व जि.प. सदस्य तथा आरपीआय (आ.) चे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांनी केले. सदर मोर्चाच्या माध्यमातून सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. झोपडपट्टीवासियांना त्वरीत जमिनीचे पट्टे द्या, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना त्वरीत कर्ज वितरित करा, पेट्रोल-डिझेल स्वस्त करा, बेरोजगारांच्या हाताला काम द्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मोर्चात शेतकरी, शेतमजुर व अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.