१४ हजार हेक्टरने वाढणार रब्बीचा पेरा
By Admin | Published: November 9, 2016 12:55 AM2016-11-09T00:55:43+5:302016-11-09T00:55:43+5:30
खरीप हंगामातील उत्पन्न निघणे सुरू असून शेतकऱ्यांची रबीचा पेरा करण्याची लगबग सुरू झाली आहे.
गहू व चणा क्षेत्र वाढण्याचा अंदाज : कृषी विभागाने केले ७५ हजार हेक्टरमध्ये नियोजन
वर्धा : खरीप हंगामातील उत्पन्न निघणे सुरू असून शेतकऱ्यांची रबीचा पेरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ७४ हजार ९०० हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६० हजार ८३० हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. यात यंदाच्या हंगामात सुमारे १४ हजार हेक्टरने वाढ होण्याचे संकेत कृषी विभागाकडून मिळाले आहे.
जिल्ह्यात चना व गव्हाचा पेरा वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यावरून दिसत आहे. यंदाच्या हंगामात गव्हाचा पेरा २५ हजार हेक्टरवर तर चन्याचा पेरा ४२ हजार हेक्टरवर होणार असल्याचे आराखड्यात सांगण्यात येत आहे. गत हंगामात गव्हाचा पेरा २१ हजार ९५० तर चन्याचा पेरा ३७ हजार ९१ हेक्टरवर झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. यंदा जिल्ह्यातील जलाशयात पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिंचन करण्यास अडचण जाणार नसल्याने गहू व हरभऱ्याचा पेरा वाढण्याचे संकेत कृषी विभागाने केलेल्या नियोजनातून दिले आहेत.
रबी हंगामाकरिता शेतजमिनी तयार करण्याच्या कामात बळीराजा व्यस्त झाला असून रबीच्या बियाण्यांकरिता त्याची धावपळ सुरू झाली आहे. मात्र खरीप हंगामात सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नसल्याने त्याच्या गाठीला शिल्लक नसल्याने रबीचा पेरा कसा करावा या विवंचनेत तो असल्याचे दिसून येत आहे. यातही महाबीजकडून होणारा बियाण्यांचा पुरवठा अत्यल्प असल्याने बियाण्यांकरिता भटकंती करण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन हंगामात बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची होत असलेली ही लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)
इतर क्षेत्रातही वाढीचे संकेत
रबी हंगामात गहू व चना या मुख्य पिकांसह ज्वारीचा पेराही करण्यात येतो. गत हंगामात जिल्ह्यात १ हजार १४९ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला होता. तो यंदा अडीच हजार हेक्टरवर होणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त करडई, तिळ, मोहरी, जवस, आदी पिकांचीही लागवड करण्यात येणार आहे. त्याचे क्षेत्रही वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे.
महाबीजकडून मिळणार निम्मे बियाणे
शेतकऱ्यांना कमी दरात व विश्वासाचे बियाणे म्हणून शासनाच्या महाबीजच्या बियाण्यांकडे पाहिले जाते. मात्र या कंपनीकडून जिल्ह्यात आवश्यक असलेल्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविण्यात येते. जिल्ह्यात गव्हाच्या २१ हजार ४५० क्विंटल बियाण्यांची गरज असताना महाबीजकडून केवळ ६ हजार ७०० क्विंटल बियाणे पुरविण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. हरभऱ्याची १५ हजार ६४० क्विंटल बियाण्यांची गरज असताना महाबीजकडून ४ हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुुळे शेतकऱ्यांना बियाण्यांकरिता खासगी दुकानात चकरा मारण्याची वेळ येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाल्याचे दिसत आहे.