जलयुक्तमुळे रबी क्षेत्रात १३ हजार हेक्टरने वाढ
By admin | Published: January 26, 2017 01:56 AM2017-01-26T01:56:26+5:302017-01-26T01:56:26+5:30
कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त
१३ हजार हेक्टरची वाढ : हरभरा पिकाच्या क्षेत्रातही वाढ
प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा
कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या अभियानामुळे पाणी उपलब्ध झाले असून तब्बल १३ हजार हेक्टर रबी क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी ५५ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा, गहु पिकांची पेरणी झाली होती. यंदा ती ६८ हजार २५० हेक्टरमध्ये झाली आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकानंतर शेतकरी रबी हंगामात हरभरा, गहु यासह अन्य पिकांची लागवड करीत असतात. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने यापूर्वी निर्धारित क्षेत्रातच रबी हंगामाची पेरणी होत होती. हे क्षेत्र कमी करून सिंचन सुविधा वाढविण्याकरिता राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. नाला खोलीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे आदी अनेक कामे हाती घेण्यात आलीत. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून बहुतांश शेतकरी रबी हंगामातील पिकांची पेरणी करू शकले आहेत.
मागील वर्षी तुरीला सर्वाधिक भाव मिळाले होते. यामुळे यावर्षी तुरीचा पेरा वाढला होता. तूर हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्या शेतात रबी हंगामातील पिके घेता येत नाहीत. असे असले तरी जिल्ह्यातील रबी पिकांच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ५८ हजार हेक्टर क्षेत्रात रबी हंगामातील पिकांची लागवड करण्यात आली होती. ती यंदा ६८ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. यात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी वाढल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचेच दिसून येत आहे.
२४ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित पाणी
४जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. प्रकल्प पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानची कामे करण्यात आल्याने जलसाठा वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिके जगविण्याकरिता या पाण्याचा फायदा झाला. जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्राला यंदा संरक्षित पाण्याचा वापर करता आला आहे. शिवाय याच पाण्यातून शेतकऱ्यांना रबी हंगामाकरिता जमिनी तयार करून ठेवता आल्यात.
अप्रत्यक्षरित्याही शेतकऱ्यांना लाभ
४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरित्याही फायदा झाला आहे. नाला सरळीकरण, खोलीकरण, बांध बंदिस्तीच्या कामांमुळे जलसाठा वाढला. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतातील, अनेक गावांतील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कुपनलिकांची स्थितीही सुधारल्याचे दिसून येत आहे.
जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. परिणामी, रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्र वाढून ६८ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यात हरभरा पिकाचे प्रमाण अधिक आहे. ही कामे शेतकऱ्यांना लाभदायकच ठरत आहेत.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.