रबी क्षेत्रात होणार घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:36 PM2018-10-22T23:36:02+5:302018-10-22T23:37:48+5:30
यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तूलनेत रबी पीक लागवडीच्या क्षेत्रात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. शिवाय गहू व चना पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून तसेच त्याचे योग्य नियोजन करूनच सदर पिकांची लागवड करावी, असा सल्ला सध्या त्यांच्याकडून दिल्या जात आहे.
वर्धा जिल्ह्यात सुमारे ६२ हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड केली जाते. जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे समाधानकारक पाऊस झाल्यावर हे क्षेत्र ९५ हजार हेक्टर होईल असे बोलले जात होते. परंतु, यंदा पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक जलाशये तळ दाखवत आहेत. शिवाय शेतातील विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. ज्यांच्याकडे रबी पिकांना दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी चना पिकाची लागवड करावी. असे न केल्यास चना उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लाऊ शकते. तर ज्याच्याकडे पिकाला सहा वेळा पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी यंदा गहू पिकाची लागवड करावी, असेही कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रबी हंगामाच्या तयारीत असणाºया शेतकºयांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात यंदा शेती करावी.
चन्याचे वाण कमी पाण्यात तग धरणारे
ज्यांच्याकडे दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशा शेतकऱ्यांनी चना पिकाची लागवड करताना जॅकी ९२१८ या वाणाची निवड करणावी. चन्याचे हे वाण कमी पाण्यात तग धरणारे असल्याने उत्पन्न समाधानकारक होण्याची शक्यता असते. तर ज्यांच्याकडे पिकाला चार पाणी देण्याची व्यवस्था आहे त्या शेतकºयांनी विशाल व विजय या चन्याच्या वाणाची लागवडीसाठी निवड करावी, असे सांगण्यात आले.
मुबलक पाणी नसेल तर गव्हाची लागवड धोक्याची
ज्या शेतकऱ्यांकडे पिकाला सहा वेळा पाणी देता येईल अशाच शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात गहू पिकाची लागवड करावी. ज्यांच्याकडे मुबलक पाण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची लागवड करण्याचे टाळले पाहिजे. अन्यथा त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
२० दिवसांच्या अंतराने पिकाला द्यावे पाणी
जमिनीत ओलावा असेल तर पेरणीनंतर २० दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. जॅकी वानाच्या चन्याची लागवडीसाठी निवड केल्यास पिकाला २० दिवसांनी पहिल्यांदा तर ६० दिवसांनी दुसऱ्यांना पाणी द्यावे. तर चन्याच्या विशाल व विजय वानाची निवड शेतकऱ्यांनी केली असल्यास त्यांनी पिकाला २०,६० व ८० दिवसानंतर पाणी द्यावे.
तर गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जमिनीत ओलावा नसल्यास पेरणीला पहिल्यांदा पाणी द्यावे. त्यानंतर २०-२० दिवसाच्या अंतराने सहा टप्प्यात गव्हाला सिंचन करावे. पाण्याचे योग्य नियोजन करून रबी पीक घेतल्यास शेतकºयांना संभाव्य धोका टाळता येत असल्याचे सांगण्यात आले.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडला आहे. शिवाय जिल्ह्यातील जलायशांच्या पाणी पातळीतही पाहिजे तशी वाढ पावसाळ्यात झाली नाही. त्यामुळे रबी पीक घेण्याचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून चना व गहू पिकाची लागवड करावी.
- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.