...अन् पोलिस ठाण्याच्या पायरीपर्यंत कामगार म्हणे डोक्यावर बंदूक ताणली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:10 PM2023-08-10T15:10:29+5:302023-08-10T15:16:59+5:30
एफसीआय गोदामात राडा : प्रकरण पोहचले पोलिस ठाण्यात अन् नंतर निवळले
वर्धा : वेतन वाढीची मागणी करीत कामगारांनी कंत्राटदारासोबत थेट भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदामात राडा केला. कंत्राटदाराच्या बॉडीगार्ड्सनेही कामगारांना शिवीगाळ केल्याचे खुद्द कामगारांनीच सांगितले. पुढे बंदूकही ताणून मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले. प्रकरण सेवाग्राम पोलिस ठाण्यात पोहचले. अन् पोलिस ठाण्याच्या पायरीपर्यंत डोक्यावर बंदूक ताणली, असे म्हणणाऱ्या कामगारांनी मात्र, बंदूक निघालीच नाही, असे पोलिसांना बयाण दिले. पोलिसांनी कामगारांची आणि कंत्राटदाराची तक्रार नोंदवून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला.
प्राप्त माहितीनुसार, एफसीआय गोदामातील कामगारांनी मुंबई येथील कंत्राटदार पाटील यांना वेतनवाढीसह इतर मागण्या केल्या. कंत्राटदार आणि कामगारांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर लगेच वादाची ठिणगी पडली. कामगारांनी काम बंद पाडून गोदामासमोर ठिय्या दिला. काही कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले आणि कामगारांवर कंत्राटदाराने बंदूक ताणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे जोरजोराने सांगू लागले. त्यानंतर सेवाग्राम पोलिसांत कामगारांनी गर्दी करत ही बाब सांगितली. पोलिसांनी लगेच कंत्राटदाराला पोलिस ठाण्यात आणले. कामगारांनीही गर्दी केली होती. मात्र, प्रकरण पोलिस ठाण्याच्या पायरीवर पोहचताच कंत्राटदाराने बंदूक काढलीच नाही, असे पोलिसांना बयाणात सांगितले. कंत्राटदार आणि कामगार यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत कामगारांची समजूत घालून प्रकरण शांत केले.
पोलिस ठाण्यासमोर कामगारांची होती गर्दी
भारतीय खाद्य निगमच्या गोदामात झालेल्या राड्यानंतर शेकडो कामगारांनी सेवाग्राम पोलिस ठाणे गाठून कंत्राटदारावर कारवाई करण्याचा टाहो फोडला. पण, पोलिस ठाण्याची पायरी चढताच प्रकरण निवळले.
‘तो’ खिशाला बंदूक लावूनच फिरत होता
पाटील नामक कंत्राटदाराला पोलिस ठाण्यात बोलाविले असता त्याच्या पॅन्टच्या खिशाला बंदूक लागलेली असल्याचे तेथे उपस्थित सर्वांनाच दिसत होते. त्याच्याकडे परवाना देखील होता, असे पोलिसांकडूनच समजले. पण, बंदूक खिशाला लावून प्रदर्शन करणे ही बाब चुकीचीच असल्याचे उपस्थित नागरिकांनी बोलून दाखविले तर त्याला काही पोलिसांनीदेखील दुजोरा दिला.