दारूविक्रेते व महिला मंडळात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:20 PM2018-03-03T23:20:37+5:302018-03-03T23:20:37+5:30

Rada in liquor shops and women's board | दारूविक्रेते व महिला मंडळात राडा

दारूविक्रेते व महिला मंडळात राडा

Next
ठळक मुद्देडांगरी वॉर्डातील घटना : दोन्ही गटाच्या पोलिसात तक्रारी; गुन्हे दाखल

ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : येथील डांगरी वॉर्ड भागात दारूविक्रेते व दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यात धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी चांगलाच राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत काही महिला जखमी झाल्या असून दोन्ही पक्षांच्यावतीने हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी ४ वाजताच्या सुमारास परस्परांना मारहाण करण्याचा हा प्रकार घडला. डांगरी वॉर्ड भागात वर्ष भरापूर्वीपर्यंत गावठी दारूचा महापूर वाहत होता. स्थानिक परिसरातील महिलांनी आपले संघटन उभारून संघटनेच्या अध्यक्ष पुजा प्रवीण काळे (२५) यांच्या नेतृत्त्वात अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात लढा उभारला. पोलीस विभागाच्या मदतीने अवैधदारू विक्रीवर नियंत्रणही मिळविण्यात आले;पण शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे पुन्हा डांगरी वॉर्ड शहरात चर्चेचा विषय ठरला. हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चला होळीच्या दिवशी पुजा काळे हिने डांगरी वॉर्ड परिसरात रेखा मेंढे यांचे घरून दारू विक्री सुरू असल्याची पोलीस विभागाला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून सदर घराची झडती घेतली;पण दारू आढळून आली नाही. या घटनेच्या अनुषंगानेच धूलिवंदनाच्या दिवशी डांगरी वॉर्ड येथे दारू विक्रीचा आरोप होत असलेला गट व महिला मंडळाच्या सदस्य यांच्यात शाब्दीक चकमक होत वादाचे हाणामारीत रुपांतरण झाले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही पक्षाने हिंगणघाट पोलीस ठाण्यात येऊन एकमेकांच्या विरोधात तक्रारी सादर केल्या. महिला मंडळाच्या अध्यक्ष पुजा काळे हिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिला व तिच्या सोबत असलेल्या पाच महिलांना धुलीवंदनाच्या दिवशी मिना गोडे व तिच्या १९ समर्थकांनी वाद करून जबर मारहाण केली. या संदर्भात हिंगणघाट पोलिसांनी नवीन खुशाल गोडे (२४) व संदीप नथ्थू थुटरकर यांना अटक केली. आहे. तर दुसºया गटाकडूनही या संदर्भात हिंगणघाट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. चांदणी संदीप थुटरकर (२७) हिने सादर केलेल्या तक्रारीत धुलीवंदनाच्या दिवशी महिला मंडळाच्या अध्यक्ष पुजा काळे व तिच्यासोबत असलेल्या १२ जणांनी घरी येऊन शिवीगाळ करीत मारहाण केली. डांगरी वॉर्ड येथे दारूबंदी महिला मंडळ स्थापन झाल्यापासून आम्ही दारूविक्रीचा व्यवसाय बंद केला;पण महिला मंडळाद्वारे वारंवार पोलीस पाठवून मानसिक त्रास दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमुद आहे. या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत प्रवीण काळे (३०) याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पोलीस विभागावर पक्षपातीपणाचा आरोप
हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल करताना पक्षपात केल्याचा आरोप करीत शनिवारी दोन्ही गटांनी वर्धा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. या संदर्भात ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्याची संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्राप्त तक्रारीनुसार दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला आहे. यात कोणताही पक्षपात झालेला नाही. धूलिवंदनच्या दिवशी संघर्ष झाल्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत दोन्ही गटांना समजावून तणाव निवळल्याचेही त्यांनी सांगितले.
काळेसह त्यांच्या पंधरा समर्थकांनी काढली रात्र एसपी कार्यालयात
हिंगणघाट शहरातील काही दारूविक्रेते व दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्य करणाºया दारूबंदी महिला मंडळाच्या महिलांमध्ये धूलिवंदनाच्या दिवशी चांगलाच राडा झाला. यात काही जण जखमीही झाले आहेत. सदर प्रकरणी दोन्ही पक्षांकडून हिंगणघाट ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. घटनेनंतर पुजा काळे व त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत हिंगणघाट ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर घाबरलेल्या महिलांनी मध्यरात्रीच थेट वर्धा शहर गाठून एसपी कार्यालयात समोर ठिय्या देत रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात काढली.
शनिवारी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. कार्यालयात नसल्याने दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) पराग पोटे यांच्याशी या महिलांनी भेट घेऊन घटनेबाबतची माहिती देत निवेदन सादर केले. संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: Rada in liquor shops and women's board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.