कण वाळूचे रगडिता पैसाच मिळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:50 PM2019-04-23T21:50:20+5:302019-04-23T21:50:40+5:30
लिलावच होत नसल्याने पुलगाव नजीकच्या गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राला वाळूमाफिया, चोरांनी टार्गेट केले आहे. या पात्रातून दररोज बेसुमार वाळूउपसा सुरू असतो. उपसा केलेल्या वाळूची गुंजखेडा आणि पुलगाव येथे मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत असल्याने घरोघरी वाळूचा गृहोद्योग थाटण्यात आल्याचेच निदर्शनास आले आहे.
सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लिलावच होत नसल्याने पुलगाव नजीकच्या गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राला वाळूमाफिया, चोरांनी टार्गेट केले आहे. या पात्रातून दररोज बेसुमार वाळूउपसा सुरू असतो. उपसा केलेल्या वाळूची गुंजखेडा आणि पुलगाव येथे मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत असल्याने घरोघरी वाळूचा गृहोद्योग थाटण्यात आल्याचेच निदर्शनास आले आहे. गुंजखेडा-पुलगाव फार कमी अंतर आहे. केवळ रस्ता ओलांडून शहरातील वाळूमाफिया, वाळूचोरांना पल्याड म्हणजे वाळूघाटात शिरता येते. यंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने संपूर्ण पात्र खुले आहे. यामुळे चांगलेच फावत असून नदीपात्रात पुलगाव, देवळी इतकेच नव्हे, तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील वाळूमाफियांनी धुडगूस घातल्याची स्थिती आहे.
गुंजखेडा आणि पुलगावातील काही भागात फेरफटका मारला असता कित्येक घरी चोरीच्या वाळूचे मोठ्या प्रमाणावर ठिय्ये आढळून येतात. नजर जाईल तिकडे वाळूच दिसते. माफियांकडून दररोज किमान ४० ते ५० ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरून नेली जात आहे. एकट्या गुंजखेड्यात २ हजार ब्रासवर वाळूसाठा साठविण्यात आला असल्याने गृहोउद्योग थाटले की की काय, असा प्रश्न पडतो. हा चोरटा व्यवसाय ‘सावर’ण्याकरिता काही अधिकाऱ्यांचेही ‘कर’ जुळत आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या वाळूउपस्यामुळे पात्रात डोह तयार झाले असून धोकादायक वळणावर आहे. दुसरीकडे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो आहे, तर स्थानिक प्रशासनाकरिता हा घाट सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरला आहे.
नदीपात्रात ६ कोटींची वाळूसंपत्ती
जिल्ह्यातील पुलगावपासून अवघ्या पाच-सात किलोमीटर अंतरावर असलेला गुंजखेडा वाळूघाट दीड ते दोन किलोमीटरचा असून यात ६ कोटींवर वाळूसंपत्ती आहे. या संपत्तीची चोरांकडून निरंतर लूट सुरू आहे.
आठ वर्षांपासून घाट लिलावावर बंदी
गुंजखेडा नदीपात्रात केंद्रीय दारूगोळा भांडाराचे पंपिंग स्टेशन आहे. यामुळे भांडार प्रशासनाकडून घाट लिलावास ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे आठ वर्षांपासून प्रशासनाकडून लिलाव केला जात नाही. याच संधीचे वाळूचोरांनी सोने केले आहे.
नुकत्याच केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून संपूर्ण वाळूसाठा जिल्हास्थळी आणून त्याचा लिलाव करण्यात येईल. याशिवाय गुंजखेड्यात कारवाईचे सत्र सुरूच ठेवू.
- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.
कोटींची वाळू खाऊन माफिया मस्तवाल
गुंजखेडा घाटातील वाळूचा रात्री-बेरात्री अवैध वारेमाप उपसा करून पुलगावतीलच दोन ते तीन बड्या माफियांनी कोट्यवधींची माया जमविली आहे. प्रशासनाला विकत घेण्याची क्षमताच या व अन्य वाळूमाफियांनी निर्माण केली आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून गुंजखेडा घाटातून वाळूचोरीचा गोरखधंदा स्थानिक प्रशासनाच्या आशीवार्दाने सुरू असून माफियांसोबतच तहसीलचे अधिकारी, कर्मचारीदेखील गब्बर झाले आहेत. तसेच काही वाळूमाफियाच अधिकाºयांत मध्यस्ती करीत असल्याचे अनेक सबळ पुरावे ‘लोकमत’कडे उपलब्ध आहेत.