राहुल गांधी पदयात्रेतून करणार ‘संकल्प’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:01 PM2018-10-01T23:01:09+5:302018-10-01T23:01:31+5:30
बापू कुटीत लावणार बेलाचे झाड : आश्रम परिसरात घेणार भोजन, जाहीर सभेसाठी कार्यकर्ते सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते बापू कुटीत परंपरेप्रमाणे बेलाचे वृक्ष लावले जाणार आहे. त्यानंतर कॉँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते रसोड्यामध्ये साध्या पद्धतीचे भोजन घेतील. यानंतर कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर राहुल गांधी सेवाग्रामवरून वर्धेत दाखल होतील. यावेळी कॉँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांसह पदयात्रा करून ते संकल्प रॅलीला मार्गदर्शन करणार आहेत.
राहुल गांधी यांच्या सर्कस ग्राऊंड येथील सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी अखिल भारतीय कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खा. मलीकाअर्जून खरगे, राष्ट्रीय महासचिव अशोक गहलोत, एस. तेलम, हर्षवर्धन सपकाळ आदींनी वर्धा व सेवाग्राम येथील राहुल गांधी जाणार असणाऱ्या सर्व स्थळांची पाहणी केली. राहुल गांधी यांच्या रॅली मार्गाचीही त्यांनी पाहणी केली. गेल्या तीन दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सेवाग्राम व वर्धा येथे या दौऱ्याच्या निमित्ताने आढावा घेत आहेत. चव्हाण यांनी रविवारी आ. रणजीत कांबळे, आ. अमर काळे, महिला प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस, शेखर शेंडे यांच्याशी चर्चा केली. स्थानिक नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. वर्धा येथे होणारी सभा ऐतिहासिक करण्याच्या दृष्टीने विदर्भातून कॉँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही सभा कॉँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारी ठरेल, असा विश्वास कॉँग्रेस नेत्यांना आहे.
शहर कॉँग्रेसमय
सेवाग्राम आश्रम परिसरासह वर्धा शहरात कॉँग्रेस पक्षाच्यावतीने पदयात्रेनिमित्त मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. पदयात्रेच्या मार्गावर भाजप सरकारकडून करण्यात येत असलेल्या विकास कामांना गेल्या दोन दिवसात गती देण्यात आली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुर्णाकृती पुतळा आकर्षक रंगाने सजविण्यात आला आहे. पुतळा परिसरात गट्टू (पेवींग ब्लॉक) लावण्यात आले आहे. पुतळा परिसरापासून पदयात्रेचा मार्ग स्वच्छ करण्यात आला असून स्थानिक नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग जोमाने काम करीत आहे.
अशी असेल ३. कि.मी.ची पदयात्रा
राहुल गांधी वर्धा शहरात ३.कि.मी. पायी चालणार आहेत. दुपारी २.४५ वा. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळून पदयात्रेला सुरुवात होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा मार्गे झांसी राणी चौक (पोस्ट आॅफीस), इतवारा चौक, पटेल चौक, अंबिका हॉटेल चौक, बालाजी मंदिर, सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, गजानन सायकल स्टॅण्ड चौक मार्ग राहुल गांधी सभास्थळी सर्कस ग्राऊंडवर पोहचतील. त्यांच्या समावेत ५० हजार कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
संकल्प रॅली देणार काँग्रेसला नवसंजीवनी
स्थानिक सर्कस ग्राऊंड मैदानावर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संकल्प रॅली आयोजित करण्यात आली आहे. २०१९ मध्ये देशात पुन्हा कॉँग्रेसची सत्ता आणण्याच्या संकल्प करीत ते उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. ही रॅली काँग्रेसला नक्कीच नवसंजीवनी देणारी ठरेल.
रसोड्यामध्ये भोजन व्यवस्था
आश्रम परिसरातील शांती भवनच्या मागच्या बाजूला सभागृह व रसोडा असून येथे कॉँग्रेस नेत्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कॉँग्रेस नेत्यांनी आणलेला खानसामा स्वयंपाक करेल. अंत्यत साध्या पध्दतीचे जेवण राहुल गांधी घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हेलिपॅड ते आश्रम बंदोबस्ताची चाचणी
सोमवारी पोलीस व एसपीजीने सेवाग्राम येथील हेलिपॅड ते आश्रम अशा मार्गावर बंदोबस्ताची चाचणी घेतली. ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आश्रम परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धाही घेण्यात येत आहेत.