गुुंजखेडा घाटावर छापा, दोन बोटी फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:28+5:30
वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात आल्याची वारंवार ओरड होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : नजीकच्या गुंजखेडा वाळू घाटावर अवैधरित्या बोटीच्या (तराफे) सहाय्याने वाळू उपसा सुरु होता. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा मारला असता १३ बोटी पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यामुळे हाती लागलेल्या दोन बोटी फोडून जवळपास १० ट्रॅक्टर वाळू साठा जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत चालली.
वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात आल्याची वारंवार ओरड होत आहे.
अशातच बुधवारी वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळताच तलाठी तामगाडगे यांनी वाळू घाटावर छापा टाकला असता नदीपात्रात पंधरा बोटी दिसून आल्या. पथक दिसताच १३ बोटी पळून गेल्या तर दोन बोटी हाती लागल्याने कुऱ्हाडीच्या सहाय्याने त्या फोडून टाकल्या. याची माहिती तलाठ्यांनी तहसीलदार राजेश सरवदे यांना दिल्यानंतर त्यांनी लागलीच जेसीबीसह पोलीस पाठविले. त्यांनी वाळू घाटांवरुन दहा ट्रॅक्टर वाळूसाठा जप्त केला. आता हा वाळूसाठा कोणाचा याची माहिती प्रशासन घेणार का? असा प्रश्न आहे.
तलाठ्याची धाडसी कारवाई
पावसामुळे नदी तुडूंब भरली असून त्यामध्ये बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून येताच तलाठी मनोज तामगाडगे यांनी नदीपात्रात पोहोत जाऊन दोन बोटी पकडल्या. मात्र, तेरा बोटी त्यांच्या हातून निसटल्या. यापूर्वीच्या कारवाईतही त्यांनी नदी पात्रात उडी घेऊन एक बोट हस्तगत केली होती. त्याच्या या धाडसी कारवाईची सध्या चर्चा आहे.