अफवेच्या बाजारात ग्राहकांची लुटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:56 PM2018-12-18T23:56:15+5:302018-12-18T23:56:44+5:30
पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी वाढीव दर चुकवत बोअरवेल करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. सध्या या अफवेमुळे ग्राहकांची चांगलीच लूट सुरुअसून ही अफवा कुणी पसरविली व का? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यातील पाणीबाणी तीव्र होतांना दिसून येत असल्याचा फायदा आता काही मंडळी घेताना दिसून येत आहे. सध्या जलाशयात केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागातही तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही अवस्था असताना भविष्यात नागरिकांना आठ ते पंधरा दिवसानंतर पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नागरिकांनी बोअरवेल करण्याचा पर्याय निवडला आहे. बोअरवेलला मागणी वाढत असताना पाहून ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी हातचे काम सोडून मशीन मिळविण्यासाठी बोअरवेल व्यावसायीक व एजंटकडे धाव घेतली आहे.
सध्या तर बोअरवेलचे भावही वीस ते तीस रुपयाने वाढविण्यात आले आहे. नागरिकांची गरज लक्षात घेत अफवेचा दाखला देऊन आणखी जास्त पैसे कसे उकळता येईल, याचाच प्रयत्न काहींकडून सुरु आहे. परंतु संबधित विभागाकडे बोअरवेल करण्याच्या बंदीबाबत विचारणा केली असता कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आल्याने ही केवळ अफवाच असल्याने उघडकीस आले आहे.
एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांना मानुसकीच्या नात्याने सहकार्य करण्याऐवजी दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलून आपले खिसे भरण्याचा लाजिरवाणा प्रकार काहींनी चालविल्याने दिसून येत आहे. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन ही लुटमार थांबवित यावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरतांना दिसून येत आहे.
बोअरवेल व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूट
शहरात सध्या बोअरवेल दर वाढले आहे. कमी दरात दुसरा बोरवेल व्यावसायिक बोरवेल करायला तयार असल्यास वर्ध्यातील बोअरवेल व्यवसायिक असोसिएशन त्याला वर्ध्यात काम करु देत नाही.अशा प्रकारे शहरातील नागरिक व शेतकऱ्यांची बोअरवेल व्यावसायिकांनी लुट चालविली आहे. असा आरोप किसान सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजू हिंगमोरे यांनी केला आहे. डिझलचे भाव कायम असतानाही बोअरवेलचे दर वाढविण्यात आल्याने यावर लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणीही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याबाबत कुठलाही आदेश किंवा पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. तसे असते तर कार्यालयाकडून संबंधितांना आधीच सूचना दिल्या असत्या, असे भूजल सर्वेक्षण अधिकारी भुसारी यांनी सांगितले.
वर्ध्यात आठ व्यवसायिक आहेत. एका दिवशी दोन बोरवेल केले जात आहे. सध्या डिझलचे भाव वाढल्याने आणि कामागांची मजूरी वाढल्याने बोरवेलचे दर वाढवावे लागले, असे बोअरवेल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जावंधिया यांनी सांगितले.
बोरवेलनंतर आता जलपुनर्भरणाची गरज
जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून गरजेनुसार सर्वच नागरिक भूगर्भ पोखरायला लागले आहे. पाचशे मीटरच्या परिसरात दुसरे बोअरवेल करता येणार नाही, असे नियम असतानाही याला छेद दिला जात आहे. तसेच दीडशेपेक्षाही जास्त फुट खोलपर्यंत बोअरवेल केली जात आहे. यामुळे भविष्यात भूगर्भातील पाणीही नाहिसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन प्रत्येकाने घरी व कार्यालयात जलपुनर्भरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.