पार्किंगबाबत रेल्वे प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:32 PM2017-09-04T23:32:49+5:302017-09-04T23:33:34+5:30

रेल्वे स्थानकावरील वाहनांची पार्किंग हा मुद्दा मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासन जागा देत नाही ....

Railway administration neutral about parking | पार्किंगबाबत रेल्वे प्रशासन उदासीन

पार्किंगबाबत रेल्वे प्रशासन उदासीन

googlenewsNext
ठळक मुद्देमोकळी जागाही केली बंदिस्त : रेल्वे स्थानकासमोर वाहने ठेवणाºयांवर कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वे स्थानकावरील वाहनांची पार्किंग हा मुद्दा मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासन जागा देत नाही आणि स्थानकासमोर वाहने ठेवली तर वाहतूक पोलीस कारवाई करतात, या प्रकारामुळे प्रवासी त्रस्त आहेत. आता तर रेल्वे प्रशासनाने सुसज्ज केलेली मोकळी जागाही लोखंडी साखळीने बंदिस्त केली. यामुळे वाहने ठेवायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेल्वे स्थानकावर दिवसभर प्रवासी, पाहुण्यांना घेण्याकरिता आलेले नागरिक तथा आरक्षित तिकीट काढण्यासाठी येणाºया नागरिकांचा राबता असतो. हे नागरिक रेल्वे पोलीस ठाण्यासमोर वाहने उभी करीत होते; पण तेथे नो पार्किंगचा फलक लावला व वाहतूक पोलीस शाखेला पत्र देत कारवाई करण्यास सांगितले. रेल्वे पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेली जागाही पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली नाही. तिकीट घराच्या मागील भागात रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरण केले. तेथे पार्किंगची व्यवस्था केली जाईल, अशी अपेक्षा होती; पण काल-परवा ती जागाही लोखंडी साखळीने बंदिस्त करण्यात आली आहे. यामुळे त्या भागातही वाहने ठेवणे कठीण झाले आहे. वाहतूक विभागाने रेल्वेच्या भिंतीलगत रस्त्याच्या कडेला जागा दिली; पण ती अपूरी आहे. मग, वाहने ठेवणार कुठे, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.
भिंतीलगतची जागा पार्किंगसाठी तोकडी
वाहतूक पोलिसांनी रेल्वेच्या भिंतीलगत रस्त्याच्या कडेला पार्किंगसाठी जागा दिली. तत्सम फलकही लावले; पण ती जागा अत्यंत तोकडी आहे. या ठिकाणी दुचाकी उभ्या केल्यास त्या रस्त्यावर येऊन अपघाताला निमंत्रण ठरणार आहे. यामुळे आता वाहतूक पोलिसांचीच अडचण वाढली असून पुन्हा जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.
चारचाकींवरही कारवाई
रेल्वे प्रशासन पार्किंगची व्यवस्था करण्याऐवजी वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याबाबत पत्र देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या निर्देशानुसार दुचाकींवर कारवाई करण्याचे पत्र दिले. आता तर हद्दच झाली आहे. रेल्वे भिंतीच्या आतील चार चाकी वाहनांवरही कारवाई करण्यात यावी, असे पत्र रेल्वे प्रशासनाने वाहतूक पोलिसांना दिले आहे. हा प्रकार प्रवाशांच्या जीव्हारी लागणारा ठरत आहे.
सौंदर्यीकरण केलेली जागा बंदिस्त
रेल्वे पुलाच्या बाजूने तिकीट घराच्या मागे रेल्वे प्रशासनाकडे प्रशस्थ मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेला रेल्वे प्रशासनाकडून टाईल्स लावण्यात आल्या. फुल झाडे लावून परिसर सुशोभित करण्यात आला. आता या ठिकाणी रेल्वेकडून पार्किंगची व्यवस्था केली जाईल, अशी अपेक्षा होती; पण झाले उलटच. ही जागाही रेल्वे प्रशासनाद्वारे बंदिस्त करण्यात आली आहे. यामुळे आधीच पार्किंगसाठी जागा नसताना आता रेल्वे स्थानक परिसरात चार चाकीसह दुचाकी वाहने कुठे उभी करावीत, हा प्रश्नच आहे. प्रवाशांनी ‘पे अ‍ॅण्ड पार्क’मध्ये वाहने ठेवावी, असा उद्देश रेल्वे प्रशासनाचा असेल तर तेही करता येईल; पण त्यासाठी त्या परिसरातही जागा गरजेची आहे. रेल्वे प्रवासी तथा तिकीट घेण्यास येणाºया नागरिकांशी काहीही देणे-घेणे नाही, अशीच भूमिका रेल्वे प्रशासन घेत असल्याचे दिसून येत आहे.
जबाबदारी झटकली
रेल्वेस्थानकावर येणाºया प्रवाशांना पार्किंगची सुविधा पुरविणे, ही रेल्वेची जबाबदारी आहे; पण रेल्वे स्थानक प्रशासन ती झटकत असल्याचे दिसते. वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यास सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.

रेल्वेकडून पत्र प्राप्त झाले हे खरे आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या जागेत वाहने उभी करावीत. रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त पत्रानुसार कारवाई केली जाणार आहे. याचा नागरिकांना त्रास होऊ शकतो.
- दत्तात्रय गुरव, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.

Web Title: Railway administration neutral about parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.