वर्धा नदीच्या खोऱ्यात परत धडधडणार रेल्वे
By Admin | Published: February 5, 2017 12:33 AM2017-02-05T00:33:39+5:302017-02-05T00:33:39+5:30
झुक-झुक झुक-झुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. आजही हे गाणे जेव्हाही कानावर पडते
कास्तकारांना हक्काची बाजारपेठ मिळणार : पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्ग सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
वर्धा : झुक-झुक झुक-झुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. आजही हे गाणे जेव्हाही कानावर पडते तेव्हा डोळ्यासमोर येते ती झुक-झुक आवाज काढणारी हर फिक्र को धुएं से उडाता चला गया.. याच अविर्भावात सुरेल शिट्टी वाजवत आपल्या लटक्या चालीत कोळशावर धावणारी शकुंतला. ही शकुंतला वर्धा नदीच्या खोऱ्यात परत धडधडणार हे ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नव्याने शकुंतला रेल्वे रुळाचे सर्वेक्षण हाती घेण्याचे बजेटमध्ये घोषित केले आहे. यावेळी हा नवा रेल्वे मार्ग पुलगाव-आर्वी-वरुडपर्यंत असणार आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यातून धावणारी ही रेल्वे वरुड मार्गे थेट काश्मीरपर्यंत कनेक्ट होणार आहे. संपूर्ण उत्तर भारतातून मुंबई बंदराकडे निर्यात होणारा माल आणि मुंबई बंदरातून उत्तर भारतकडे आयात होणारा माल याच मार्गावरुन नेता येईल. वर्धा नदीच्या कास्तकारांना परत एकदा हक्काची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
आर्वी-पुलगाव नॅरोगेज ब्रॉडगेज परीतर्वनाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. दि. ०६ आॅगस्ट २०१४ रोजी शून्य प्रहारातून तसेच दि. १० आॅगस्ट २०१६ रोजी नियम ३७७ अंतर्गत प्रत्यक्षपणे लोकसभेत या बहुप्रलंबित मागणीवर खा. रामदास तडस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रभावीरित्या मांडली गेली. भारत सरकारच्या व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमातून ‘पुंजीनिवेश कार्यक्रम २०१७-१८’ या योजनेतून शकुंतला रेल्वे, आर्वी-पुलगाव, मूर्तीजापूर-यवतमाळ, मूर्तीजापूर-अचलपूर या रेल्वे मार्गांना ब्रॉडगेज परिवर्तनाकरिता मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे आत्महत्याग्रस्त वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या बाजार पेठेकडे जाण्याकरिता मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच रेल्वेच्या आवागमनामुळे परिसरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या रेल्वे मार्गाचे परिवर्तन ब्रॉडगेजमध्ये होत असल्याने अनेक प्रवाश्यांना थेट आर्वी तालुक्याशी कुठल्याही प्रकारची गाडी न बदलता भविष्यात प्रवास करता येणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
पुलगाव-आर्वी-वरूड या रेल्वेमार्गाच्या मंजुरीचा विषय होता किचकट
८५-८६ च्या काळात शकुंतलाला अखेरचे बॉयलरमध्ये पाणी भरताना पाहिले असेल. ३५ वर्षे लोकांना सेवा देत शकुंतला धापा टाकत धावत होती. एकदिवस अचानक कोळश्याचे इंजिन बंद पडले काही दिवसांनी डिझेलचे इंजिन आले. नव्या इंजिनवर शकुंतला १०-१५ वर्षे धावली. बेढब इंजिन असलेली ही नवी रेल्वे नावापूर्तीच शकुंतला होती. एकेदिवशी शकुंतलेचा ब्रिटिशांबरोबर असलेला करार संपुष्टात आला. रेल्वे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
शकुंतला पुलगाव स्टेशनच्या यार्डात उभी राहू लागली. आर्वीला उरले फक्त ओसाड स्टेशन आणि गंजलेल्या रुळांचे सांगाडे. शकुंतलाने आणलेली समृध्दी जाताना ती घेऊन गेली. तिच्या भरोश्यावर पाटीलकी गाजवणाऱ्या कास्तकारांच्या हातात दोरखंडाचा फास देऊन. ३५ वषे झालेल लोअर वर्धा धरणाचे काम सुरू होऊन आता कुठे पाणी अडवण्यापूरते काम झाले, पण शेतकऱ्यांचे शेत कोरडेच आहेत. ३५ वर्षात ३५ एकरचा शेतकरी ५ एकरवर आला आहे. पुलगाव-आर्वी-वरूड या लाईनच्या मंजुरीच्या किचकट व कठिण प्रवासात दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळल्याचे बोलले जात आहे.. आर्वी परिसरातील ज्या सर्व तरूणांनी शकुंतला रेल्वेसाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनांना व प्रयत्नांना आता यश आले आहे.