स्पेशल ट्रेनचे ओझे उतरणार; वाढीव तिकीट होणार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 06:17 PM2021-11-15T18:17:38+5:302021-11-15T18:22:27+5:30
येत्या पंधरवड्यापासून सर्वच स्पेशल ट्रेन या पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असून, या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेवाहतूक बंद करण्यात आली होती; मात्र आता कोरोना नियंत्रणात आला असून, केवळ स्पेशल ट्रेन सुरू असल्याने प्रवाशांना अतिरिक्त तिकिटांचा भार सहन करावा लागत होता; मात्र आता स्पेशल ट्रेन पुन्हा रेग्यूलर होणार असून, तिकीट दरातही कमी होणार आहे. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.
कोरोनामुळे केवळ स्पेशल रेल्वेगाड्यांची धडधड वर्धा रेल्वेस्थानकाहून सुरू होती. रेल्वेतून प्रवासासाठी आरक्षणाची अट असल्याने सर्वसामान्यांना दुप्पट दराने तिकीट खरेदी करावे लागत होते; मात्र येत्या पंधरवड्यापासून सर्वच स्पेशल ट्रेन या पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असून, या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
गाड्यांची संख्या पूर्वीप्रमाणे
कोरोनापूर्वी वर्धा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वेगाड्यांची अपडाऊन धडधड सुरू होती; मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने रेल्वे सेवा तब्बल वर्षभर ठप्प होती. त्यानंतर ३२ स्पेशल ट्रेन सुरू करून आरक्षणाची अट कायम ठेवण्यात आली; मात्र आता पूर्वीप्रमाणे या सर्व स्पेशल ट्रेन रेग्यूलर होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
दुप्पट तिकिटांचा बोझा होणार कमी
आरक्षण असल्याशिवाय रेल्वेतून प्रवास शक्य नसल्याने प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. यात प्रवाशांना कमी अंतर जाण्यासाठीदेखील दुप्पट पैसे मोजावे लागत होते; मात्र आता स्पेशल ट्रेन या पूर्वीप्रमाणे धावणार असल्याने दुप्पट तिकिटांचा बोझा कमी हाेणार आहे.
पॅसेंजर होणार सुरू
रेल्वे विभागाकडून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १७ नाेव्हेंबर रोजीपासून वर्धा, अमरावती वर्धा ही पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे या मार्गावर आवागमन करणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे. प्रवासी सामान्य तिकीट खरेदी करून या रेल्वेतून प्रवास करू शकणार आहे, तसेच नागपूर ते अमरावती, नागपूर ते भुसावळ, बल्लारशाह वर्धा भुसावळ, काजीपेठ पॅसेंजरही सुरू करण्याची मागणी होत आहे.
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन..
मुंबई - हावडा स्पेशल.
अहमदाबाद - पुरी स्पेशल.
पुणे - नागपूर स्पेशल.
पुणे - हावडा स्पेशल.
पुणे - हटिया स्पेशल.
मुंबई - नागपूर स्पेशल.
पुणे - अजनी स्पेशल.
ओखा - खुर्द स्पेशल.
गांधीधाम - विशाखापट्टनम स्पेशल.