भाजप शहर अध्यक्षाच्या घरावर रेल्वे विभागाचा छापा; पिता-पुत्राची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:27 AM2020-02-12T10:27:53+5:302020-02-12T10:28:13+5:30
सुमारे दोन तास अधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली.
वर्धा : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्या जात असल्याचा ठपका ठेवत वर्धा येथील भाजप शहर अध्यक्ष पवन परियाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी दुपारी रेल्वे विभागाच्या नागपूर येथील चमूने छापा टाकला. त्यानंतर सदर चमूतील अधिकाऱ्यांनी पवन परियाल व त्यांच्या मुलाला ताब्यात घेत सुमारे दोन तास विचारपूस केली. चौकशी अंती सदर पिता-पुत्रास सोडून देण्यात आले आहे.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे जिल्ह्यात चांगलेच सक्रीय आहेत. अशाच गैरप्रकार करणाऱ्यांवर वेळोवेळी छापा टाकून रेल्ये विभागाच्यावतीने कारवाईही केली जाते. पवन परियाल व त्यांचे पूत्र रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने रेल्वे विभागाच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी परियाल यांच्या घरी छापा टाकला होता.
त्यानंतर रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करता असा ठपका ठेऊन परियाल पिता-पुत्रांना ताब्यात घेऊन वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात नेण्यात आले. तेथे सुमारे दोन तास अधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आल्याचे सदर चमूतील कनोजिया नामक अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची चमू आली होती. त्यांनी आम्हाला ताब्यात घेत विचारपूसही केली. परंतु, त्यांना काहीच मिळाले नसल्याने त्यांनी आम्हाला सोडून दिले, हे वास्तव आहे. पवन परियाल ( भाजप शहर अध्यक्ष, वर्धा )