रेल्वे प्रवाशांचे खिसे कापणारा जेरबंद
By admin | Published: March 13, 2017 12:42 AM2017-03-13T00:42:19+5:302017-03-13T00:42:19+5:30
स्थानिक लोहमार्ग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून खिसेकापूला अटक केली. ही कारवाई
लोहमार्ग पोलिसांची कारवाई : मोबाईलसह चांदीचा ऐवज जप्त
वर्धा : स्थानिक लोहमार्ग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून खिसेकापूला अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास वर्धा रेल्वेस्थानक परिसरात केली. चोरट्याकडून पोलिसांनी मोबाईल व चांदी असा एकूण ११ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिलिंद सुरेश (२९) रा. जुनी वस्ती इंझाडपुरा, बडनेरा जि. अमरावती असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रांनुसार, वर्धा लोहमार्ग पोलिसांची चमू रात्र गस्तीवर असताना वर्धा रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर बिकानेर-सिकंदराबाद एक्सपे्रस आली. दरम्यान ओमप्रकाश वैंकटय्या रापौली (२७) रा. निजामपुरा बडोदा व संगीता सुनील माळी (२२) रा. हैद्राबाद यांनी आपला मोबाईल व चांदीचे साहित्य पळविल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय चोरटा वर्धा रेल्वे स्थानकावर उतरल्याचे म्हणत त्याचे थोडक्यात वर्णनही सांगितले. त्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याच्या शोधासाठी तीन चमू तयार केल्या. शोध मोहिमेदरम्यान वर्णन केलेला संशयीत इसम रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकींग परिसरात आढळून आला. पोलीस दिसताच त्याने पळ काढण्याच्या प्रयत्न केला असता त्याला अटक केली.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता एक महागडा मोबाईल व चांदीचा ऐवज मिळून आला. ताब्यात घेतलेल्या चोरट्याविरुद्ध वर्धा लोहमार्ग पोलिसात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. ही कारवाई वर्धा लोहमार्ग पोलीसचे निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, हनवंते, लवटावार, मुंजेवार, राहुल येवले, नितीन शेंडे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)