पाऊस बेपत्ता; सोयाबीनने टाकली मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:28 AM2017-08-18T01:28:46+5:302017-08-18T01:32:28+5:30
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही. परिणामी, सोयाबीनचे उत्पन्न गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शिवाय कपाशीचीही तिच अवस्था आहे. पाऊस नसल्याने जमिनी भेगाळल्या आहेत. यामुळे कपाशीलाही फुले-पात्या येत नसल्याने त्याच्या उत्पन्नाची आशा धूसर झाली आहे.
आतापर्यंत आलेल्या पावसामुळे पिके हिरवी दिसत होती; पण जलसाठ्यात पाण्याचा थेंब नव्हता. पावसाअभावी जलसाठेही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे रबी हंगामही आताच धोक्यात आला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस येईल, असे चित्र निर्माण होते; पण काही काळातच आकाश पुन्हा निरभ्र होऊन उन्ह तापते. यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे.
यंदा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सर्वत्र भक्कम पाऊस पडेल, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या; पण त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले. या परिस्थितीतही जिल्ह्यात दीड लाख हेक्टरच्या आसपास सोयाबीनचा पेरा झाला आहे तर अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात आज-उद्या पाऊस येईल, असे वाटत असताना आता पावसाची आशाही मावळली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरड्या दु्ष्काळाची चिन्हे आहेत.
पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतकºयांचा सण पोळा तोंडावर आला आहे. याच काळात पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे पोळ्याचा सण कसा करावा, असा विचार शेतकरी करीत आहेत. शेतात पिकांनी टाकलेल्या माना आणि गाठीला नसलेला पैसा, यामुळे शेतकºयांची चांगलीच वाताहत झाल्याचे चित्र आहे. यातच कर्जमाफीचाही आधार मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत. यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची मागणी जोर धरत आहे.