‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:55 PM2018-06-03T23:55:04+5:302018-06-03T23:55:04+5:30
उन्हाळा आला की पाणीटंचाई डोके वर काढते. या काळात पुन्हा पाण्याचे महत्त्व प्रत्येकाच्या तोंडी येते; पण पावसाळा आला की हेच महत्त्वाचे पाणी नाल्यांनी धो-धो वाहते. त्याच्या नियोजनाचा विचार होत नाही. याच पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास भूगर्भातून होणाऱ्या पाण्याच्या उपस्याचे पुनर्भरण होणे शक्य आहे.
रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळा आला की पाणीटंचाई डोके वर काढते. या काळात पुन्हा पाण्याचे महत्त्व प्रत्येकाच्या तोंडी येते; पण पावसाळा आला की हेच महत्त्वाचे पाणी नाल्यांनी धो-धो वाहते. त्याच्या नियोजनाचा विचार होत नाही. याच पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास भूगर्भातून होणाऱ्या पाण्याच्या उपस्याचे पुनर्भरण होणे शक्य आहे. ही बाब आतापर्यंत अनेक प्रयोगांतून सिद्ध झाली आहे. आता पुन्हा पावसाळा आला आहे. नागरिकांनी त्यांच्या घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या उपस्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याकरिता ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ हाच एक नव्हे तर एकमेव पर्याय राहिला आहे.
ग्रामीण भागात मागील दोन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून रानावनात अटकाव करून ते पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न सुरू झाला. वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवण करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियानातून प्रयत्न होत आहे. या तुननेत शहरी भागात मात्र असे काही होताना दिसत नाही. शहरी भागात नागरिकांच्या घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाते. यावर पावसाच्या पाण्याचे संकलन करणे हाच पर्याय आहे आणि ते सहज शक्य असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहे. नागरिकांकडून छतावरील पाणी एका ठिकाणी जमा करून ते विहिरीत सोडणे वा आपल्या घराच्या आवारात शोषखड्डा निर्माण करून त्यात हे पाणी मुरविणे शक्य आहे.
पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याकरिता वर्धेतील वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने एक मॉड्यूल तयार केले आहे. त्याला शासनाच्यावतीने मान्यताही देण्यात आली आहे. ते वापरल्यानेही पावसाच्या पाण्यावे पुनर्भरण करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. या दिशेने नागरिकांनी वेळीच आपली जबाबदारी ओळखून रेन वॉटर हार्वेस्टींग करून पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. या प्रकारातून दिवसेंदिवस खालावत असलेली भूगर्भातील पाण्याची पातळी सांभाळणे शक्य आहे.
नव्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग व्हावे
सध्या सर्वत्र सिमेंटीकरणाचे जाळे पसरत आहे. गावोगावी सिमेंटचे रस्ते, नाल्या निर्माण होत आहे. शहरी भागात घरोघरी पेव्हींग ब्लॉकचा वापर होत आहे. यामुळे कुठेही पाणी साचत नाही. अशा भागात जमिनीचा आणि पावसाच्या पाण्याचा संपर्कही होत नसल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार सर्वच इमारतीत होत आहे. यामुळे नवीन इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींग सक्तीचे करणे गरजेचे झाले आहे. या संदर्भात मध्यंतरी शासनाच्यावतीने सूचना करण्यात आल्या होत्या; पण त्याकडे सर्वत्र दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून आले आहे.
वर्धा जिल्ह्यात नव्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहे; पण तशी सक्ती करण्यात आली नाही. ऐच्छिक असलेल्या प्रकारात नागरिकांकडून विशेष सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. मग, अशा महत्त्वाच्या कामाकरिता प्रशासनाकडून सक्ती का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत शहरी भागात नगर परिषदेच्यावतीने एक सर्व्हे करण्याची गरज आहे.
भूजल पुनर्भरण करण्याकरिता १०० मिमी पाऊसही पुरेसा आहे. विदर्भात तर यापेक्षा दहा पट म्हणजे १००० मिमीच्या आसपास पाऊस येतो. यातील केवळ १०० मिमी पावसाचे संकलन केल्यास मोठा लाभ होऊ शकतो. शहरी भागात असलेल्या मोकळ्या जागेवर जर एक शोषखड्डा निर्माण केला तर एका वॉर्डात मोठ्या प्रमाणात पाण्याचे संकलन सहज शक्य आहे. याच प्रकारातून इतरत्रही पावसाच्या पाण्याचे संकलन शक्य आहे. सर्वांनी एकत्र येत प्रयत्न केल्यास येणाºया दुष्काळाच्या संकटावर वेळीच मात करणे शक्य आहे.
- डॉ. सचिन पावडे, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.
शासनाच्या नव्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु तशी सक्ती करण्यात आली नाही. यामुहे नागरिकांनी जागृत होवून स्वत: पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास त्यांचाच त्रास कमी होईल. प्रत्येकाने जागरूक नागरिकाप्रमाणे पावसाच्या पाण्याचे संकलने केल्यास दुष्काळावर मात करणे शक्य आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी वर्धा.
राष्ट्रीय कर्तव्यच समजा
दुष्काळी स्थिती निवारण्याकरिता वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे. या गरजेपोटी यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून ते कार्य करण्याची गरज आहे. शहराच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतो. तो भरून काढण्याकरिता हाच एक उपाय आहे.