वर्ध्यातले पर्जन्यमान केंद्र दहा वर्षांपासून आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:23 PM2017-11-14T14:23:24+5:302017-11-14T14:26:12+5:30
शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे.
अमोल सोटे।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे. परिणामी, शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. यासाठी त्वरित यंत्रणा उभी करून पर्जन्यमान केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
दहा वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात पर्जन्यमान केंद्र निर्माण करण्यात आले होते. यासाठी पर्यायी अधिकारीही देण्यात आले होते. दोन वर्षे येथे अचूक आकडेवारी मिळत होती. यानंतर मात्र यातील यंत्र कुलूपबंदच असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे देखभाल व दुरूस्ती करण्यात आली नसल्याने सदर केंद्र बंद पडले आहे. केंद्राच्या सभोवताल तयार केलेल्या कुंपणाला लोखंडी गेट लावले होते. त्याला असलेले बंद कुलूप पूर्णपणे जंगलेले आहे; पण त्याची दुरूस्ती व पाहणी कोणत्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत केली नाही. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका येथे बसत आहे.
यानंतर दुसरे पर्जन्यमान केंद्र त्याच्या शेजारीच उभारण्यात आले. त्याच्यासमोर असलेल्या फलकावर महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र महाराष्ट्र शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.लि. यांचा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प, अशा पद्धतीचा मजकूर लिहिलेला आहे. याही गेटच्या कुलूपाला दोन वर्षांपासून जंग चढला आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. शेतकºयांना वेधशाळेची अचुक माहिती मिळाल्यास पाऊस कधी येणार, किती होणार या सर्व बाबींवर पीक परिस्थिती अवलंबून असते. यामुळे लाखो रुपये खर्च करून त्याचे फलित मिळणार नसेल तर उपयोग काय, हा प्रश्नच आहे. शासनाने हवामान व पर्जन्यमान केंद्राचे धोरण स्पष्ट केले. दोन्ही केंद्र एकाच ठिकाणी असल्याने तालुकानिहाय पावसाची आकडेवारी तंतोतंत मिळण्यास मोलाची मदत होते.
दुसऱ्या केंद्राचेही दोन वर्षांपासून कुलूप बंदच
तहसील कार्यालय परिसरात दहा वर्षांपूर्वी लावण्यात आलेले पर्जन्यमापक केंद्र बंद आहे. यामुळे त्यातील यंत्रही खराब झाले. परिणामी, दोन वर्षांपूर्वी दुसरी यंत्रणा उभारण्यात आली; पण दोन वर्षांपासून त्या यंत्रणेचेही कुलूप उघडण्यात आलेले नाही. यामुळे गेटवरील कुलूप गंजले असून पावसाचे मोजमापच घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनाही अचुक पावसाचा अंदाज कळत नाही. परिणामी, पिकांचे नियोजन करता येत नाही. ही यंत्रणा सुधारण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
पाहणीही नाही
दहा वर्षांपासून बंद असलेल्या पर्जन्यमान केंद्राची साधी पाहणी करण्याचे सौजन्यही अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. यामुळे खर्च व्यर्थ गेल्याचेच दिसून येत आहे.