पावसाचा टक्का घटला, प्रकल्प तळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:35 AM2017-08-03T02:35:06+5:302017-08-03T02:35:32+5:30
समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण आता तो फोल ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण आता तो फोल ठरत आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. परिणामी, सरासरी पावसाचा टक्का घटला आहे. मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत ७५.३९ टक्के सरासरी पाऊस झाला होता; पण यंदा केवळ ४७.६० टक्के पावसाची नोंद झाली. मागील वर्षीपेक्षा तब्बल २७.७९ टक्के पाऊस कमी झाला आहे. सध्या कडक उन्ह तापत असल्याने जलाशयांची स्थिती ढासळणार असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी पावसाचे बºयापैकी आगमन झाले. आॅगस्ट महिन्यापर्यंत जलाशयांनी ५० ते ६० टक्के पातळी गाठली होती. पिकांचीही स्थिती सोयाबीन वगळता बºयापैकी होती; पण यंदा सध्या पिकांची स्थिती चांगली असली तरी पाऊस मात्र बेपत्ता आहे. यावर्षी मान्सून चांगला राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रारंभी तशी वातावरण निर्मितीही झाली; पण पावसाचा खंड कायम राहिला आहे. खरीप हंगामात उशीरा का होईना; पण बºयापैकी पाऊस झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. यानंतर काही दिवस पावसाचे सातत्य तथा ढगाळी वातावरण कायम होते; पण आता मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ताच झाला आहे. उन्हाळ्यागत उन्ह तापू लागले आहे. उघाड मिळाल्याने शेतातील डवरणी, निंदणाची कामे उरकली जात आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास काही भागातील पिकांची वाढ खुंटणार असल्याचे सांगितले जात आहे.
मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण ५,४४३.२० मिमी तर सरासरी ६९४.१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ३,५०५.७५ मिमी तर सरासरी ४३८.२२ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत ७५.३९ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी केवळ ४७.६० मिमी पाऊस झाला असून गतवर्षीपेक्षा तो २७.७९ टक्के कमी झाला आहे. यामुळे हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरल्याचेच दिसून येत आहे. बुधवारी कारंजा वगळता जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद नाही. कारंजा तालुक्यात ४.६० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित सातही तालुक्यांत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. उलट उन्ह तापत असून दमट वातावरण असल्याने पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील जलाशयांमध्ये जलसंचय होत नसल्याने पिण्याचे, औद्योगिक तथा पिकांना पाणी पुरविणे कठीण होणार आहे. बोर आणि धाम प्रकल्पामध्ये जलसाठा होणे अत्यंत गरजेचे असते; पण यंदा धाम प्रकल्पामध्ये केवळ १९.५६ टक्के तर बोर धरणात २५.२० टक्के जलसाठा आहे. धाम प्रकल्पाचे १५ दलघमी पाणी पिण्यासाठी तथा नोंदणीकृत उद्योगांकरिता आरक्षित आहे. शिवाय काही पाणी खरीप व रबी हंगामात पिकांना दिले जाते; पण आणखी काही दिवस पाऊस न आल्यास यात कपात करावी लागणार आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पांत किमान ५० ते ६० टक्के जलसाठा अपेक्षित असतो; पण यंदा पाऊसच न आल्याने पाण्याची पातळी वाढलेली नाही. परिणामी, उन्हाळ्यात पाणी कपात अटळ असून टंचाईची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकºयांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसते.
ओल असल्याने पिकांची स्थिती समाधानकारक
अधिक प्रमाणात पाऊस आला नसला तरी जिल्ह्यातील शेतजमिनीमध्ये अद्याप ओल आहे. उघाड मिळाल्याने शेतकरी डवरणी, निंदणाची कामे करीत आहे. यामुळे पिकांची वाढ होत आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. यामुळे सध्या पिकांची स्थिती समाधानकारक आहे. असे असले तरी आणखी काही दिवस पाऊस न आल्यास विपरित परिणाम होऊ शकतो.
स्वत: जिल्ह्यातील पिकांची पाहणी केली. सध्या पिके समाधानकारक आहे. डवरणी, निंदणाच्या कामामुळे पिकांना हरित द्रव्ये मिळत आहे. जमिनीतही ओल असल्याने पिके सुस्थितीत आहेत. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास सोयाबीन, कपाशी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.