वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’
By admin | Published: May 29, 2017 01:10 AM2017-05-29T01:10:43+5:302017-05-29T01:10:43+5:30
शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’ झाली.
खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित : झाडे कोसळल्याने वाहतूकही प्रभावित
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’ झाली. पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले.
शहरात सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. तब्बल अर्धा ते एक तास पावसाची रिपरिप सुरू होती. तळेगाव (श्य.पं.) परिसरात सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान वादळासह पाऊस आला. यामुळे रस्त्यावरील व गावातील झाडे कोसळली. जुन्या वस्तीतील काही घरांवरील टिना उडाल्या. यात जीवित हानी झाली नाही. काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे भुईमुंग पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. आष्टी शहरात वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वीज तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला आहे. कारंजा तालुक्यात सेलगाव (लवणे) परिसरात खैरी (टॉवर) येथील शेखर पठाडे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. यात त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. छप्पर उडाल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महसूल विभागाला माहिती देण्यात आली; पण सायंकाळपर्यंत पंचनामा झाला नव्हता. समुद्रपूर तालुक्यात नारायणपूर परिसरात शनिवारी दुपारी वादळी वारा व पावसाने अनेकांच्या घरांवरील छप्पर उडाले. पाठर येथील १० ते १५ घरावरील टिनपत्रे उडाल्यात. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आंजी (मोठी) व सेवाग्राम वादळी वारा आणि पावसाचे आगमन झाले. पवनार येथे पाऊस नसला तरी वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. यामुळे नुकसान झाले. कुठे विद्युत खांब कोसळल्यामुळे तर कुठे वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना त्रास झाला.
हिंगणघाट शहरासह तालुक्यात वादळ
रविवारी सायंकाळी हिंगणघाट शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्याचे तांडव सुरू होते. सुमारे पाऊण तास वादळी वाऱ्याने थैमान घातल्यानंतर शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. यात कुठे नुकसान झाले नसून पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. समुद्रपूर तालुक्यात रविवारीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. शिवाय देवळी शहरासह तालुक्यातील पुलगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यात कुठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पावसामुळे उकाडा मात्र कमी झाल्याचे जाणवत होते.