पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ ओस; व्यापारी दारोदारी, शेतकऱ्यांकडून कापूस मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 02:42 PM2022-11-23T14:42:09+5:302022-11-23T14:45:35+5:30
भाववाढीची प्रतीक्षा
विजय माहुरे
सेलू (घोराड) (वर्धा) : दसऱ्यापासून फुलणारी पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ नागदिवाळी आली तरी ओसच पडलेली दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असल्याने खेडा खरेदीलाही प्रतिसाद नाही. व्यापारी कापसाकरिता गावोगावी जात असून, त्यांनाही शेतकरीकापूस देत नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागत असल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षीच्या खरिपात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे २ लाख १५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाअभावी आणि नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या उत्पादनात घट होणार असल्याने भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी दसऱ्यापर्यंत कापूस निघायला सुरुवात व्हायची. गावात येणाऱ्या व्यापाऱ्याला थोडाफार कापूस विकून शेतकरी दिवाळी सण साजरा करायचे. परंतु, यावर्षी दिवाळी झाल्यानंतर कापूस निघायला सुरुवात झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही निघाला नाही. हल्ली कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळायला लागला असून, बाजारपेठेत आवकच नाही. व्यापारीही आता गावागावांत जाऊन कापसाचा शोध घेत असून, शेतकरीही प्रतिसाद देत नसल्याने या व्यापाऱ्यांचा काटा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कापूस वेचणीलाही वेग नाही...
आधी अतिवृष्टी, तर आता लाल्या रोगामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरी अपेक्षेप्रमाणे कापूस आलेला नाही. मागील वर्षी कापसाने जो भाव खाल्ला होता, तोच यावर्षीही मिळण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कापसाला ब्रेक लागला असल्याचे बोलले जात आहे. कापूस निघायला उशिराने सुरुवात झाली असून, अजूनही वेचणीस गती मिळाली नाही. याचाही परिणाम बाजारपेठेतील आवकेवर झाला आहे.
अतिवृष्टीमुळे कापूस वेचणीस विलंब झाला. अन्य उत्पादनही कमी होत आहे; पण वर्तमानपत्रातील बातम्या आणि कापूस तज्ज्ञांनी भाववाढीचा वर्तविलेला अंदाज यामुळे कापूस उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत असावेत. यामुळेच व्यापारी लिलावात अजूनपर्यंत आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची आवक बाजारपेठ मंदावली आहे.
महेंद्र भांडारकर, प्रभारी सचिव, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, ता. सेलू
सोयाबीनचे पीक हातातून गेल्यामुळे आता कपाशीवर भिस्त आहे. भविष्यात कापसाचे भाव बारा ते चौदा हजारावर जातील, अशी आशा आहे. त्यामुळे गावखेड्यात कापूस खरेदी करणाऱ्यांना कापूस विकणे टाळत आहे. दिवाळीत खरी आर्थिक तंगी असते; पण आता सोयाबीन आणि कापूस दिवाळी झाल्यावर घरी आला आहे. आता शेतमाल वाढण्याची अपेक्षा आहे.
प्रवीण खोपडे, शेतकरी, घोराड