राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारावे
By admin | Published: June 27, 2017 01:17 AM2017-06-27T01:17:34+5:302017-06-27T01:17:34+5:30
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण व क्रीडा प्रसार करण्यावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
रामदास तडस सामाजिक न्याय दिन कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण व क्रीडा प्रसार करण्यावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृष्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने वेगळ्या शाळा भरविण्याची पद्धत बंद केली. हे विचार लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावपातळीवर नेत आजच्या पिढीने अंगिकारावे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्यायभवनात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी सामाजिक न्याय दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, समाज कल्याण सभापती नीता गजाम, हांडे, विवेक भालकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके आदी उपस्थित होते.
खा. तडस पूढे म्हणाले की, गाव सक्षम होत नाही, तोपर्यंत शहर सक्षम होत नाही. यासाठी गावाचा विकास गरजेचा आहे. शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेत शासनाने मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना दिल्या. शाहू महाराजांचे विचार गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.
तराळे यांनी शाहू महाराजांनी भारतीय समाजात समरसता निर्माण केली. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह कायदे करून मागासवर्गीय महिला-पुरुषांना समान हक्काचा अधिकार दिला, असे सांगितले.
याप्रसंगी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रास्ताविक देशमुख यांनी केले तर आभार रामटेके यांनी मानले.