पैशाच्या वादातून राजेश उईकेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:00 AM2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:14+5:30
पोलीस सूत्रानुसार, मृतक राजेश उईके व आरोपी प्रशांत तुमडाम याचा भाऊ किरण यांच्यात चांगली मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी प्रशांत व राजेश यांच्या आर्थिक व्यवहार झाले. वारंवार पैशाची मागणी करून राजेशकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्याबाबतचा राग प्रशांतच्या मनात होताच.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धारदार शस्त्राने वार करून आदिवासी कॉलनी येथील राजेश उईके (३६) याची हत्या करण्यात आली. सदर प्रकरणातील आरोपीला रामनगर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली असून पैशाच्या वादातून राजेशला चाकूने मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम, असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याने चाकूने राजेशच्या अंगावर चक्क २१ घाव घालून त्याच्या शरीराची चाळणीच केली.
पोलीस सूत्रानुसार, मृतक राजेश उईके व आरोपी प्रशांत तुमडाम याचा भाऊ किरण यांच्यात चांगली मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी प्रशांत व राजेश यांच्या आर्थिक व्यवहार झाले. वारंवार पैशाची मागणी करून राजेशकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्याबाबतचा राग प्रशांतच्या मनात होताच. अशातच जुगारात राजेश सुमारे १ हजार ५०० रुपये जिंकला. ही रक्कम त्याच्या जवळ असल्याचे लक्षात येताच पैशाच्या कारणावरून आरोपीने त्याच्याशी वाद केला. यावेळी आरोपी प्रशांत तुमडाम याने जवळ असल्या चाकूने राजेशवर सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला.
सदर घटना उघडकीस येताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून गुन्ह्याची नोंद घेतली. घटनेच्या दिवशीपासून राजेशचा आरोपी पसार होता. त्याला रामनगर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. शिवाय, अटकेतील आरोपीची १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, रामनगरचे ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक शंकर भलावी, धर्मेंद्र अकाली, संतोष कुकडकर, नीलेश करडे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज तेलगोटे करीत आहेत. पोलीस कोठडीदरम्यान अटकेतील आरोपी आणखी काय कबुली देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नातेवाईकांच्या घरी घेतला होता आश्रय
राजेश उईके याची हत्या करून घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीने जिल्ह्याबाहेर पलायन केले. इतकेच नव्हे, तर आरोपी प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम याने त्याचा मोबाईलही स्वीच आॅफ केला होता. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांच्या चमूने नागपूर गाठून गवळीनगरातातून प्रशांतच्या नातेवाईकाच्या घरून त्याला ताब्यात घेतले.
मुलीला पाहणे राहून गेले
मृतक राजेश उईके याला नऊ दिवसांची एक मुलगी आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी प्रसुतीकरिता माहेरी गेली होती. तिने गोंडस अशा एका मुलीलाही जन्म दिला. तिचा चेहराही घटनेच्या दिवशीपर्यंत मृत राजेशने बघितले नव्हता. अशातच राजेशची हत्या करण्यात आल्याने त्याचे मुलीचा चेहरा पाहणे राहून गेले, हे विशेष.
गुन्ह्यातील चाकू अन् रक्ताने माखलेले कपडे जप्त
आरोपी प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम याच्याकडून रामनगर पोलिसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहे.
चार वर्षांपूर्वीही झाला होता वाद
मृत राजेश व आरोपी प्रशांत यांच्यात चार वर्षांपूर्वी क्षुल्लककारणावरून वाद झाला होता. त्यावेळी चांगलीच मारहाण झाली होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
मृताच्या शरीराची केली चाळणी
आरोपी प्रशांत याने निर्दयतेचा कळस गाठून राजेश याच्या शरीरावर चाकूने वार केले. मृतकाच्या छाती, पोट, कुशी, पाठीवर एकूण तब्बल २१ घाव केले. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला होता; पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा
राजेश उईके (३६) हत्या प्रकरणात अटक केलेला आरोपी प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे पुढे आले आहे.
त्याच्यावर यापूर्वी भादंविच्या कलम ४३६ अन्वये गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.