ग्रामीण रुग्णालय रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:23 AM2017-08-15T00:23:45+5:302017-08-15T00:24:13+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाही. भरती रुग्णांबाबत प्रचंड हेळसांड होते. थातुरमातुर उपचार करून रुग्ण इतर दवाखान्यातुन सुट्टी घेवून कसा जाईल यासाठी डॉक्टर व कर्मचारी प्रयत्नात असतात. रात्रपाळी पुरुष परिचारक वॉर्डात उपस्थित न राहता रात्रभर दवाखान्यातील दुसºया खोलीत झोपतो, अशा एक ना अनेक तक्रारी रुग्णांच्या आहेत. यामुळे शासकीय रुग्णालयाबाबत रोष वाढत आहे.
रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे दाखले येथील रुग्ण डोळ्यात पाणी आणून सांगत आहेत. येथील रुग्णांनी एका सुरात येथील डॉक्टर व कर्मचाºयांच्या वेळकाढू प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी येथेच कार्यान्वीत व आताच एम.डी.चे शिक्षण पूर्ण करुन परतलेले डॉक्टर संजय वाघमारे यांना हा प्रकार सांगून रुग्णांच्या वॉर्डात बोलविण्यात आले. त्यांच्या समोर सर्व रुग्णांनी आपबिती कथन केली. तेव्हा तेही थक्क झाले. येथे कार्यान्वीत रात्रपाळीतील पुरुष अधिपरिचारक (स्टाफ नर्स पुरुष) हा वॉर्डात राहत नसून तो चक्क रात्रभर दुसºया खोलीत झोपून राहतो. रात्री रुग्ण बेवारस राहतात, असा आरोप रुग्णांकडून होत आहे.
रात्री रुग्ण डॉक्टरला बोलावायला त्यांच्या खोलीत गेला तर पुरुष परिचारकाकडे जाण्याचे सांगितले जाते. पुरुष परिचारकास डॉक्टरांना उठविण्यासाठी सांगितले तर तो माझी झोप खराब करु नकोस, तू स्वत:च डॉक्टरला झोपेतून उठव व दार ठोक असे उत्तर मिळते. तेव्हा रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांनी काय करावे हा प्रश्न आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कामचुकार कर्मचाºयांवर कार्यवाहीची मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे.
रुग्णांना साहित्य देण्यास नकार
रुग्णालयाला शासनाकडून सर्व वस्तुंचा पुरवठा होतो. हे डॉक्टर कबुल करतात; मात्र रुग्णांना लघवी पात्र, ओकारीचे भांडे असूनही दिल्या जात नाही. प्लास्टिकचे डब्बे रुग्ण घरून आणतात व पलंगाखाली ठेवतात. याबाबत विचारले असता त्या वस्तु रुग्णालयात असल्याचे तेथे कार्यान्वीत सर्वांनी सांगितले. मग या तशाच ठेवून रुग्णांना त्रास का देता याचे उत्तर मात्र कुणीही दिले नाही.
रुग्णांना गरज असताना व रुग्णालयात उपलब्ध असताना आवयक औषधी दिल्या जात नाही. नाममात्र गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे भरती रुग्ण दुरुस्त होत नाही व दुसºया दवाखान्याची वाट धरतो, ही वास्तविकता आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मी नागपूरला आहे, रुग्णालयात आल्यावर सर्वांना कर्तव्याची जाणीव करुन देते. तक्रारी असल्यास त्याबाबत दुरुस्तीचे काळजी घेतल्या जाईल.
- डॉ. किर्ती पाटील, वैद्यकीय अधीक्षक, सेलू.